कृत्रिम पावसासाठी यंत्रणा सज्ज

योगीराज प्रभुणे
बुधवार, 4 जुलै 2018

पथदर्शी प्रकल्पाची सुरवात 
कृत्रिम पावसाचा हा एक प्रयोग आहे. कुठे आणि केव्हा कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जातो, याची मार्गदर्शन तत्त्वे तयार करण्यासाठी हा देशातील पहिला प्रयोग सुरू आहे. कोणत्या स्थितीत कृत्रिम पावसाचा प्रयोग करता येईल, हेदेखील यातून स्पष्ट होणार आहे. या प्रयोगासाठी रडार, विमाने वापरण्यात येणार आहेत. पडलेला पाऊस मोजण्यासाठी जमिनीवर पाऊस मोजणारी 120 उपकरणे बसविण्यात आली आहेत, अशी माहिती "आयआयटीएम'चे संचालक डॉ. प्रा. रवी एस. नन्जुनदैया यांनी सांगितले.  
 
पुणे : कृत्रिम पावसाची देशातील पहिल्या प्रयोगाची चाचणी मंगळवारी करण्यात आली. यात वापरण्यात येणाऱ्या सर्व उपकरणांची सक्रियता तपासण्यासाठी करण्यात आलेली ही चाचणी समाधानकारक ठरली. त्यामुळे कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने सज्ज झाल्याचे संकेत हवामानतज्ज्ञांनी दिले आहेत. 

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याच्या (मॉन्सून) प्रदेशातील कृत्रिम पावसाचा भारतातील पहिल्या शास्त्रशुद्ध प्रयोगात पुण्यातील "भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्थे'मधील (आयआयटीएम) हवामान शास्त्रज्ञ सहभागी झाले आहेत. 

कृत्रिम पावसासाठी ढगांची अचूक निवड महत्त्वाची असते. त्यासाठी सोलापूरच्या दोनशे किलोमीटर परिघातील ढगांचे अचूक विश्‍लेषण करणारे रडार उभारण्यात आले आहे. या रडारच्या माध्यमातून नेमक्‍या कोणत्या ढगांपासून कृत्रिम पाऊस पाडता येईल, हे निश्‍चित केले जाईल. वातावरणातील योग्य परिस्थिती पाहून विशिष्ट विमानातून सुरवातीला काळ्या ढगांच्या तळाला सोडियम क्‍लोराईड (मीठ) किंवा कॅल्शियम क्‍लोराईड फवारले जाणार आहे. हे मीठ ढगांमधील बाष्प शोषण्याचे काम करते.त्यामुळे मिठाच्या कणाभोवती ढगातील बाष्प जमा होते आणि त्याचा आकार वाढला की त्याचे रूपांतर पाण्याच्या थेंबात होऊन पाऊस पडतो. ही विमाने आता बारामती येथे दाखल झाली आहेत. त्यांना उपकरणे लावून मंगळवारी या विमानांनी हवेत उड्डाण केले. ही सर्व उपकरणे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाली असल्याचे या चाचणीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याला हिरवा कंदिल मिळाला असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले. 

पथदर्शी प्रकल्पाची सुरवात 
कृत्रिम पावसाचा हा एक प्रयोग आहे. कुठे आणि केव्हा कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जातो, याची मार्गदर्शन तत्त्वे तयार करण्यासाठी हा देशातील पहिला प्रयोग सुरू आहे. कोणत्या स्थितीत कृत्रिम पावसाचा प्रयोग करता येईल, हेदेखील यातून स्पष्ट होणार आहे. या प्रयोगासाठी रडार, विमाने वापरण्यात येणार आहेत. पडलेला पाऊस मोजण्यासाठी जमिनीवर पाऊस मोजणारी 120 उपकरणे बसविण्यात आली आहेत, अशी माहिती "आयआयटीएम'चे संचालक डॉ. प्रा. रवी एस. नन्जुनदैया यांनी सांगितले.  

"औरंगाबाद येथून ही विमाने उड्डाण करून सोलापूर आणि तुळजापूर येथील ढगांमध्ये रसायने फवारणार आहेत. त्यातून दुष्काळाची स्थिती असताना कृत्रिम पाऊस पाडण्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास यातून करण्यात येत आहे. या प्रयोगातून भविष्यात कोणत्या स्थितीत कृत्रिम पाऊस पाडता येईल, याची शास्त्रशुद्ध माहिती देता येईल,'' 
- डॉ. प्रा. रवी एस. नन्जुनदैया, संचालक "आयआयटीएम' 
 
Web Title: Artificial Rain Experiment Testing in Maharashtra