नवजातांसाठी कृत्रिम श्‍वासोच्छ्वास उपकरणे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

पुणे - महापालिकेच्या प्रसूतिगृहात जन्माला येणाऱ्या अर्भकांसाठी ‘गोल्डन फर्स्ट मिनिट न्यूओनेटल रेस्पिरेटर’ उपकरणे खरेदी करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. या उपकरणांमुळे नवजात अर्भकांना ऑक्‍सिजन पुरवठा करता येणार आहे.

पुणे - महापालिकेच्या प्रसूतिगृहात जन्माला येणाऱ्या अर्भकांसाठी ‘गोल्डन फर्स्ट मिनिट न्यूओनेटल रेस्पिरेटर’ उपकरणे खरेदी करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. या उपकरणांमुळे नवजात अर्भकांना ऑक्‍सिजन पुरवठा करता येणार आहे.

नवजात अर्भकाला पहिला श्‍वास घेता न आल्यामुळे त्याचा जीव धोक्‍यात येतो. श्‍वसनविषयक प्रश्‍नामुळे व ऑक्‍सिजनचा पुरवठा कमी झाल्याने देशात नवजात अर्भकांपैकी १० टक्के बाळांचा मृत्यू होतो. ऑक्‍सिजनच्या कमी पुरवठ्यामुळे मेंदूवर दुष्परिणाम होऊन बाळ मतिमंद होण्याची शक्‍यता असते. हा धोका टाळण्यासाठी ‘गोल्डन फर्स्ट मिनिट न्यूओनेट रेस्पिरेटर’ हे उपकरण उपयुक्त ठरते. बाळांना कृत्रिम श्‍वासोच्छ्वास देण्यासाठी याचा उपयोग केला जातो. बाळाचा जन्म झाल्याच्या पहिल्या मिनिटाच्या आत हे उपकरण श्‍वसनपुरवठा करते. संपूर्ण भारतीय बनावटीचे हे उपकरण वापरण्यास अतिशय सोपे व सुटसुटीत आहे. लेबर रूम, ऑपरेशन थिएटर, पेडिॲट्रिक/निओनेटल वॉर्ड आणि बाळाला रुग्णवाहिकेत हलविण्याची आवश्‍यकता भासल्यास हे उपकरण उपयोगात येते. ससून सर्वोपचार रुग्णालयासह राज्यातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये हे उपकरण वापरले जाते. गेल्या आर्थिक वर्षात चार उपकरणे खरेदी केली गेली होती, ती सध्या कमला नेहरू रुग्णालय, मालती काची रुग्णालय, गाडीखाना, सावित्रीबाई फुले रुग्णालय या ठिकाणी आहेत. नवीन उपकरणे होमी भाभा रुग्णालय (वडारवाडी), राजीव गांधी रुग्णालय (येरवडा), दळवी रुग्णालय (शिवाजीनगर) आणि सोनावणे रुग्णालय (भवानी पेठ) येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

एका उपकरणाची किंमत सात लाख पन्नास हजार रुपये इतकी असून, चार उपकरणे घेण्यात येतील. पालकमंत्री गिरीश बापट यांनी जिल्हा नियोजन समितीमार्फत त्यासाठी ३० लाख रुपयांची आर्थिक तरतूद उपलब्ध करून दिली आहे. 

कर्वे स्मारकासाठी निधी 
कर्वे रस्त्यावरील महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण आणि पुतळा उभारण्यासाठी नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांच्या वॉर्डस्तरीय निधीतून ३० लाख रुपयांच्या निधीचे वर्गीकरण करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली. कर्वे पुतळा चौकात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उड्डाण पूल उभारण्यात येणार आहे. त्याच वेळी कर्वे यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण आणि पुतळ्याच्या कामासाठी आवश्‍यक निधी वॉर्डस्तरीय विकास निधीतून उपलब्ध होणार आहे.

मेट्रोच्या ‘डीपीआर’ला मान्यता
स्वारगेट ते खडकवासला आणि स्वारगेट ते हडपसर या मार्गांवर मेट्रो मार्ग विस्तारित करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली. स्वारगेट ते खडकवासला मेट्रो मार्गामुळे दत्तवाडी, हिंगणे खुर्द, वडगाव बु., धायरी, नांदेड, किरकटवाडी, खडकवासला या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटण्यास मदत होईल. याबाबतचा प्रस्ताव सिंहगड रस्ता भागातील नगरसेवक हरिदास चरवड, मंजूषा नागपुरे आदींनी दिला होता. स्वारगेट ते हडपसर मेट्रोचा प्रस्ताव नगरसेविका रंजना टिळेकर, आबा तुपे, सुनील कांबळे, संगीता ठोसर यांनी स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला होता. 

Web Title: Artificial respiration equipment for Born Baby