कलावंताची प्रतिभा उपजत, ती घडवता येत नाही : रवी दाते 

Artist talent is born Can not make it says Senior musician Ravi Date
Artist talent is born Can not make it says Senior musician Ravi Date

पुणे : 'विशिष्ट कलागुण ही मानवाला मिळालेली देणगी आहे. कला शिकवली जाऊ शकते, कलाकार घडवायचा प्रयत्न होऊ शकतो, पण प्रतिभा उपजत असते. म्हणूनच खरा कलावंत तयार करता येत नाही, तो जन्मावा लागतो.' अशा भावना जेष्ठ संगीतकार रवी दाते यांनी व्यक्त केल्या.

'गानवर्धन' आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नारायणराव टिळक पुरस्कृत पहिला 'स्वरगंधा सांगीतिक कुटुंब पुरस्कार' दिवंगत ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. पद्माकर बर्वे व लोकप्रिय भावगीत गायिका मालती पांडे-बर्वे यांच्या कुटुंबाला दाते यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पन्नास हजार रुपये व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

याप्रसंगी गानवर्धनचे कार्याध्यक्ष प्रसाद भडसावळे अध्यक्ष कृ. गो. धर्माधिकारी, नारायणराव टिळक, आलापिनी जोशी, राजीव बर्वे, कवयित्री संगीता बर्वे, आघाडीची गायिका-अभिनेत्री प्रियांका बर्वे, प्रांजली बर्वे व सरोदवादक सारंग कुलकर्णी याप्रसंगी उपस्थित होते.

'कुटुंबातील एखादी व्यक्ती कलावंत होणेही सहजसाध्य नसताना तीन-चार पिढ्या प्रभावीपणे आपली कला सादर करत रसिकांना समृद्ध करणारे कुटुंब पाहिले की थक्क व्हायला होते. बर्वे कुटुंब अशांपैकीच एक आहे. केवळ पुर्वपुण्याईवर विसंबून न राहता स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करणार्‍या या कुटुंबातील प्रत्येकाची सांगीतिक वाटचाल म्हणूनच कौतुकास्पद अशीच आहे. ' असेही दाते म्हणाले. 

राजीव व संगीता बर्वे यांनी आपल्या मनोगतातून या पुरस्काराचे खरे श्रेय आपले गुरू पं. पद्माकर बर्वे व मालती पांडे-बर्वे यांना असल्याचे सांगितले. गानवर्धनचे अध्यक्ष कृ. गो. धर्माधिकारी यांनी पुरस्काराची भूमिका विशद करत ज्यांच्या नावे पुरस्कार आहे, त्या स्वरगंधा टिळक यांच्या गानकारर्कीदीचा परिचय करुन दिला. 

पुरस्कार वितरणानंतर पं. पद्माकर बर्वे यांच्या बंदिशी, विदुषी मालती पांडे-बर्वे यांची भावगीते, चित्रपट गीते यावर आधारित 'शब्द सूर बरवे' हा कार्यक्रम संपन्न झाला. हंसध्वनी रागातील सरगम गीताने कार्यक्रमास प्रारंभ झाला. 'जा जारे जारे जाजारे', 'श्याम मोठे दे दे' या पद्माकर बर्वे यांच्या बंदिशी राजीव यांनी गायल्या. तर संगीता यांनी सादर केलेल्या कवितांना उपस्थित रसिकांनी दाद दिली. 'लपविलास तू हिरवा चाफा' ही आपल्या आजी मालती पांडे-बर्वे यांची रचना तर 'कुणी हे पाय नका वाजवू' हे भावगीत प्रियांकाने बहारदार सादर केले.

प्रांजलीने 'पहिले भांडण केले कोणी' हे चित्रपट गीत व इंग्रजी गाणे प्रस्तुत केले. बर्वे कुटुंबाचे जावई सारंग कुलकर्णी यांनी सरोदवर 'भीमपलास' राग प्रस्तुत केला. प्रियांका बर्वे हिने सादर केलेल्या 'त्या तिथे पलीकडे' व 'खेड्या मधले घर कौलारू' या मालती पांडे-बर्वे यांच्या लोकप्रिय गीतांना उपस्थितांनी दिलेली दाद रसिकांच्या मनात अद्यापही जुन्या भावगीतांचे गारुड कायम असल्याची साक्ष देणारा होता. विक्रम भट, सिंथेसायझर दर्शना जोग', तबला तर प्रसन्न बाम यांनी संवादिनी संगत केली. सन्मानपत्र वाचन प्रियांका भडसावळे तर सूत्रसंचालन डॉ. नीलिमा राडकर यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com