pune
pune

माओवाद्यांशी संबंध : फरेरा, गोन्साल्विस यांना अटक  

पुणे : माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून नजरकैदेत ठेवण्यात आलेल्या ऍड. अरुण फरेरा आणि वेरनॉन गोन्साल्विस यांना पुणे पोलिसांनी अटक केली. तत्पूर्वी ऍड. सुधा भारद्वाज, ऍड. फरेरा, गोन्साल्विस या मानवाधिकार कार्यकर्त्यांचा जामीन सत्र न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. 

नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या कामगार नेत्या सुधा भारद्वाज यांना अटक करण्यासाठी पुणे पोलिसांचे पथक शुक्रवारी मध्यरात्री भारद्वाज यांच्या निवास्थानी पोहोचले. आज (शनिवारी) सकाळी भारद्वाज यांना अटक होण्याची शक्यता आहे.

सत्र न्यायालयाच्या जामिनाच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपील करायचे असल्यामुळे नजरकैदेत वाढ करावी, असा अर्ज फरेरा, गोन्साल्विस आणि भारद्वाज यांच्यातर्फे न्यायालयाकडे करण्यात आला होता. त्याला विरोध करताना सरकारी वकील उज्वला पवार यांनी, "जामीन फेटाळल्यानंतर नजरकैदेत वाढ करण्यासाठी आवश्‍यक तरतूदच फौजदारी प्रक्रिया संहिता तसेच यूएपीएच्या कायद्यात नाही. त्यामुळे नजरकैदेची मुदत वाढवू नये,' असा युक्तिवाद केला. बचाव पक्षाच्या वतीने ऍड. राहुल देशमुख व ऍड. सिद्धार्थ पाटील यांनी तेलुगू कवी वरवरा राव यांच्या नजरकैदेत हैदराबाद उच्च न्यायालयाने तीन आठवड्यांची वाढ केली आहे. या धर्तीवर फरेरांसह तिघांच्या नजरकैदेत वाढ करावी, असा युक्तिवाद केला. मात्र, न्यायालयाने नजरकैदेत वाढ करण्याबाबतचे अधिकार सत्र न्यायालयाला नाहीत, अशी टिप्पणी केली व हा अर्ज फेटाळून लावला. 

ऍड. सुधा भारद्वाज, ऍड. अरुण फरेरा, वेरनॉन गोन्साल्विस, तेलगू कवी वरवरा राव, पत्रकार गौतम नवलखा यांच्या घरांवर पुणे पोलिसांनी छापे टाकले होते. सीपीआय - माओवादी या प्रतिबंधित संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून पोलिसांनी 28 ऑगस्टला पाचही जणांच्या घरी छापे टाकल्यानंतर त्यांना अटक केली होती. 29 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने पाच जणांना अटक न करता त्यांच्या घरीच नजरकैदेत ठेवावे, असा आदेश दिला होता. त्यानंतर अनेकदा सर्वोच्च न्यायालयाने नजरकैदेची मुदत वाढवली होती. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली नजरकैदेची मुदत संपली. दरम्यान, बचाव पक्षाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या रिट याचिकेवर सुनावणी झाल्यावर न्यायालयाने मानवाधिकार कार्यकर्त्यांना जामिनासाठी सत्र न्यायालयांत जाण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सत्र न्यायालयात जामिनावर सुनावणी झाली. दरम्यान, नवलखा यांची अटक दिल्ली उच्च न्यायालयाने रद्द केली तर राव यांच्या नजरकैदेत हैदराबाद उच्च न्यायालयाने तीन आठवड्यांची वाढ केली आहे. फरेरा व गोन्साल्विस यांना शनिवारी पोलिस कोठडीसाठी न्यायालयात हजर केले जाईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com