गवळीच्या नावे खंडणी मागणाऱ्यांना घाबरू नका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

पारगाव - ‘‘गुन्हेगार कितीही मोठा असला, तरी तो स्वतःच्या जिवाला खूप घाबरत असतो. खुद्द अरुण गवळीला पोलिसांनी कॉलरला धरून पकडला होता. त्यामुळे त्याच्या नावाने खंडणी मागणाऱ्यांना घाबरू नका,’’ असे आवाहन मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रकाश धस यांनी केले.

पारगाव - ‘‘गुन्हेगार कितीही मोठा असला, तरी तो स्वतःच्या जिवाला खूप घाबरत असतो. खुद्द अरुण गवळीला पोलिसांनी कॉलरला धरून पकडला होता. त्यामुळे त्याच्या नावाने खंडणी मागणाऱ्यांना घाबरू नका,’’ असे आवाहन मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रकाश धस यांनी केले.

लोणी (ता. आंबेगाव) येथील व्यापाऱ्याला गवळी टोळीतील गुन्हेगारांनी ठार मारण्याची धमकी देऊन पाच लाखांची खंडणी मागितली होती; तर गावच्या सरपंचालाही धमकी देत खंडणी उकळली होती. या दोन्ही प्रकारामुळे लोणी परिसरातील गावांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांच्या सूचनेवरून पोलिस निरीक्षक धस यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. या वेळी गावातील जुगार अड्डे व बेकायदा धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. 

या प्रसंगी सरपंच सावळेराम नाईक, उपसरपंच दिलीप आदक, पिंटू पडवळ, पोलिस पाटील संदीप आढाव, माजी सरपंच दिलीप वाळूंज, उद्धव लंके, खडकवाडीचे सरपंच अनिल डोके, लक्ष्मण सिनलकर, बाळासाहेब धुमाळ, शरद बॅंकेचे संचालक अशोक आदक, राजू आदक आदी उपस्थित होते. 

कॉलरला धरून बाहेर काढले
प्रकाश धस यांनी सांगितले, ‘‘अरुण गवळी सन १९९२ मध्ये येरवडा कारागृहामध्ये होता. त्याचा जामीन अर्ज मंजूर होण्याची शक्‍यता होती. त्यामुळे त्याला दुसऱ्या गुन्ह्यात अटक करण्यासाठी मुंबई क्राइम ब्रॅंच क्रमांक ४ चे पथक सुमारे एक महिना येरवडा कारागृहाबाहेर तळ ठोकून होते. त्या पथकात मी होतो. गवळीचा जामीन अर्ज मंजूर झाल्यानंतरही इन्काउंटरच्या भीतीने तो बाहेर येत नव्हता. वकिलांनी समजावल्यानंतर तो बाहेर आला व पळतच मोटारीमध्ये जाऊन बसला. आम्ही पोलिस गाडी मोटारीला आडवी लावली. गवळी जिवाच्या भीतीने मोटारीच्या दोन्ही आसनांमध्ये घुसून लपला होता. आम्ही त्याच्या कॉलरला धरून बाहेर काढून अटक केली.’’

मंचर पोलिस ठाण्यात सन १९८० चे मनुष्यबळ अद्याप तेवढेच आहे. वाढती लोकसंख्या व गुन्हे यामुळे पोलिस कर्मचारी कमी पडत आहेत. पोलिस ठाण्याला स्वतःची जागा नाही. अशाही परिस्थितीतही कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न केला जात आहे.
 - प्रकाश धस, पोलिस निरीक्षक, मंचर 

Web Title: arun gawali ransom Do not be afraid prakash dhas