माळीनगर - येथील प्रगतशील बागायतदार व दि सासवड माळी शुगर फॅक्टरीचे माजी मॅनेजिंग डायरेक्टर अरुण ऊर्फ बापूसाहेब अनंतराव पांढरे (वय 75) यांचे रविवारी रात्री 10.30 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर आज (सोमवारी) सकाळी 9.30 वा. नीरा नदीकाठच्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी माळीनगर येथील विविध संस्थांचे पदाधिकारी, भागधारक, सभासद, कर्मचारी, शेतकरी, ग्रामस्थ, तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यापारी, वकील, डॉक्टर, पत्रकार आदी क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.
अरुण पांढरे हे गेल्या 11 वर्षांपासून अखिल भारतीय माळी समाज प्रबोधन शिक्षण संस्थेवर मुख्य विश्वस्त म्हणून काम पहात होते. येथील दि सासवड माळी शुगर फॅक्टरीचे ते 10 वर्षे संचालक, 2 वर्षे व्हाइस चेअरमन, 3 वर्षे चेअरमन, तर 9 वर्षे मॅनेजिंग डायरेक्ट होते. तसेच, सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे 9 वर्षे अध्यक्ष, 7 वर्षे चिटणीस, 2 वर्षे खजिनदार होते. त्याचबरोबर शुगरकेन सहकारी सोसायटीवर तीन वर्षे संचालकपदावर काम पाहिले होते.
|