चुकीच्या आहार व विचारांचे प्रदुषण रोखण्याची आवश्यकता: अरुणविजयजी महाराज

प्रा. प्रशांत चवरे
रविवार, 1 एप्रिल 2018

सध्या कर्करोगाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये 54 टक्के प्रमाण महिलांचे आहे. अन्न शिजविताना वापरलेली भांडी, प्लास्टीकचा मोठ्या प्रमाणात होत असलेला वापर तसेच जंक फुड यामुळे कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शुध्द व सात्विक आहार व शुध्द विचाराची समाजाला खऱ्या अर्थाने गरज आहे त्यासाठी आहारातील भेसळ व विचारांमधील प्रदुषण रोखण्याची आवश्यकता आहे.

भिगवण : आपल्या देशामध्ये दरवर्षी सुमारे सत्तर लाख लोक कर्करोगांमुळे मृत्यूमुखी पडत असल्याचे विदारक चित्र आहे. कर्करोग हा तंबाखुजन्य पदार्थांच्या सेवनाबरोबरच प्रदुषित आहारामुऴेही होतो हे लक्षात घेतले पाहिजे. आहारातील प्रदुषणाबरोबरच विचारांचेही प्रदुषण सजग समाजासाठी धोकादायक आहे. सजग, संवेदनशील व निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी चुकीचा आहार व चुकीच्या विचारांचे होत असलेले प्रदुषण रोखण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन जैन मुनी अरुणविजयजी महाराज यांनी केले.

येथील सकल जैन समाजाच्या वतीने जैन स्थानकांमध्ये महावीर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास हेमंतमुनी महाराज, भिगवण जैन संघाचे अध्यक्ष अभय रायसोनी, उपाध्यक्ष मनोज मुनोत, अशोक रायसोनी, विजयकुमार बोगावत, महेंद्र बोगावत, कमलेश गांधी, राहुल गुंदेचा, संदीप बोगावत आदी उपस्थित होते. श्री. अरुणविजयजी महाराज पुढे म्हणाले, कर्करोग हा केवळ तंबाखुजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होतो हा गैरसमज दुर करण्याची आवश्यकता आहे. सध्या कर्करोगाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये 54 टक्के प्रमाण महिलांचे आहे. अन्न शिजविताना वापरलेली भांडी, प्लास्टीकचा मोठ्या प्रमाणात होत असलेला वापर तसेच जंक फुड यामुळे कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शुध्द व सात्विक आहार व शुध्द विचाराची समाजाला खऱ्या अर्थाने गरज आहे त्यासाठी आहारातील भेसळ व विचारांमधील प्रदुषण रोखण्याची आवश्यकता आहे.

यावेळी गाईंची कत्तलखान्यापासुन सुटका करण्यासाठी अशोक रायसोनी, अभय रायसोनी, संदीप बोगावत, कमलेश गांधी, विजय रायसोनी, संजय रायसोनी, चैनसुख बोरा, लालचंद रायसोनी, उमाकांत रायसोनी व योगेश ललवाणी यांनी प्रत्येकी एक गाय पुणे येथील विरालय गोशाळेस भेट देण्याचे जाहीर केले तसेच जैनस्थानकांमधील कार्यक्रमांमध्ये प्लास्टीकचा वापर न करण्याचा संकल्पही करण्यात आला. प्रास्ताविक सचिन बोगावत यांनी केले सुत्रसंचालन राहुल गुंदेचा यांनी केले तर आभार संजय रायसोनी यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन सचिन बोगावत, हर्षद रायसोनी, निखील बोगावत, शुभंम बोरा आदींसह सकल जैन समाजाच्या वतीने करण्यात आले. 

Web Title: Arunvijay Maharaj statement in Bhigwan