Asha Bhosle : ‘पुरस्कार देण्यासाठी लतादीदी हवी होती’; आशा भोसले

लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळा
asha bhosle to be honoured with lata dinanath mangeshkar award
asha bhosle to be honoured with lata dinanath mangeshkar awardsakal

मुंबई : ‘‘आजचा हा क्षण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मला देण्यात आलेला हा पुरस्कार आज जर लतादीदींच्या हस्ते मिळाला असता तर मला अत्यानंद झाला असता. हा पुरस्कार माझ्यासाठी खूप मोठा आहे,’’ असे भावुक उद्‍गार प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी आज काढले.

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आशा भोसले यांना देण्यात आला. दरवर्षी २४ एप्रिल रोजी मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिदिनी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. मागील वर्षीपासून लता दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार देण्यास सुरुवात करण्यात आली.

पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला आणि यावर्षीचा दुसरा पुरस्कार आशा भोसले यांना देण्यात आला. या वेळी भारतीय संगीतासाठी पंकज उदास, फॅन फाउंडेशनचे गौरी थिएटर्स वर्षातील सर्वोत्कृष्ट नाटकासाठी अभिनेता प्रशांत दामले, चित्रपट क्षेत्रातील सेवेसाठी अभिनेता प्रसाद ओक आणि विद्या बालन, साहित्य क्षेत्रातील सेवेसाठी ग्रंथाली प्रकाशनचे सुदेश हिंगलासपूरकर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी उत्तराखंड येथे सरस्वती नदीच्या उगमस्थानी सरस्वतीचे मंदिर बांधून मूर्तीसमोर लता मंगेशकर यांचा पुतळा उभारला आहे. कराड यांच्या या कार्यासाठी त्यांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. हे सर्व पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते देण्यात आले.

पुरस्कार सोहळ्याप्रसंगी आशा भोसले यांनी लतादीदींच्या आठवणींना उजाळा दिला. ‘‘आम्ही पाचही भावंडे लहानपणी खूप खेळायचो. तेव्हापासून भरारी घ्यायची असेल तर गरुडासारखी घ्यावी हे वाक्य आम्ही कायम डोक्यात पक्के ठेवले होते. पहिले गाणे १९४३ मध्ये गायले होते. तेव्हापासून आजतागायत रेकॉर्डिंग आणि गाणे अविरत आहे. कलाकार कितीही मोठा झाला तरी तो प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांपेक्षा मोठा नसतो,’’ असे आशा भोसले यांनी सांगताच उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना दाद दिली.

मला संगीत क्षेत्रातील सेवेसाठी हा पुरस्कार मिळाला याबद्दल मी भाग्यवान समजतो. भारताच्या संगीत इतिहासातील हा महत्त्वपूर्ण क्षण आहे.

- पंकज उदास, गायक

हा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी सन्मानाचा आहे. लतादीदींचा आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम राहो.

- विद्या बालन, अभिनेत्री

लहानपणापासून पाच अक्षरे माझ्या सदैव कानी पडली आहेत. एक म्हणजे ‘शुभं करोती’ आणि दुसरे मंगेशकर या पाच अक्षराने माझ्यावर संस्कार घडविले.

- प्रसाद ओक, अभिनेता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com