हेचि दान देगा पांडुरंगा...

हेचि दान देगा पांडुरंगा...

पुणे/ धायरी - राही अन्‌ रखुमाईचा वल्लभ... वैष्णवांचा विठ्ठल... अर्थातच पुंडलिकाच्या परब्रह्माची आळवणी करत टाळ-मृदंगांच्या गजरात तल्लीन झालेल्या भाविकांनी आषाढी एकादशी सोमवारी (ता. २३) उत्साहात साजरी केली. ‘सर्वत्र सुख, शांती, समृद्धी नांदू दे’, ‘चांगला पाऊस पडू दे’, ‘बळिराजा सुखावू दे’, ‘सर्वांना सुखात ठेव’ अशी प्रार्थना करीत भाविकांनी विठ्ठलाला साकडे घातले. मुखाने विठ्ठलनामाचा जयघोष करीत स्वयंसेवी संस्था व मंदिर व्यवस्थापनाच्या कार्यकर्त्यांनी पुणे शहर व उपनगरांतील विठ्ठल मंदिरांत देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची ‘परब्रह्म स्वरूप’ या भावनेने सेवाही केली.   

विठ्ठलवाडीच्या मंदिरात सागर आणि अर्चना गोसावी यांच्या हस्ते विठ्ठल- रुक्‍मिणीची महापूजा करण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने चप्पल स्टॅंडची व्यवस्था करण्यात आली होती. वृत्तपत्र विक्रेता संघाच्या वतीने राजगिरा लाडूचे वाटप करण्यात आले. सतीश धोंडिबा मिसाळ प्रतिष्ठानतर्फे भाविकांना साबुदाणा खिचडी वाटण्यात आली. 

प्रेमळ विठ्ठल मंदिराचे विश्‍वस्त संदीप कवडे म्हणाले, ‘‘भीमाबाई देवकर यांनी बांधलेल्या या मंदिरात राही, रुक्‍मिणी, विठ्ठलाच्या मूर्तींचे दर्शन भाविकांना घडते. येथेच लज्जागौरीचीदेखील मूर्ती असून, एकादशीनिमित्त धार्मिक कार्यक्रम आयोजिले होते.’’  

औंध येथील विठ्ठल- रुखुमाई मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. दर्शनाला आलेल्या भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी अभंग व कीर्तन रंगले होते, अशी माहिती मंदिराचे विश्‍वस्त राहुल जुनावणे यांनी दिली. निवडुंगा विठोबा देवस्थानचे व्यवस्थापक आनंद पाध्ये म्हणाले, ‘‘पहाटेचा काकडा झाल्यावर विश्‍वस्त किशोर बाबर, ॲड. अरुण स्वामी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण वायकर यांच्या हस्ते महापूजा झाली. दुपारी साबुदाणा खिचडी व केळीचा प्रसाद वाटण्यात आला. महिलांचे भजन झाल्यानंतर ह.भ.प. बंगाळे बाई यांनी हरिकथा सांगितली.’’ 

काकडा, अभिषेक, महापूजा
विठ्ठल मंदिर (विठ्ठलवाडी), पालखी विठ्ठल मंदिर (भवानी पेठ), निवडुंगा विठोबा देवस्थान (नाना पेठ), प्रेमळ विठ्ठल मंदिर (कसबा पेठ), लकडी पूल विठ्ठल मंदिर (टिळक चौक), शेडगे विठोबा मंदिर (लक्ष्मी रस्ता), लिंबराज महाराज देवस्थान (बाजीराव रस्ता), विठ्ठल मंदिर (नवी पेठ) यांसारख्या शहर, उपनगरांतील विठ्ठल मंदिरांत आषाढी एकादशीनिमित्त पहाटेपासून काकड आरती, राही व रुक्‍मिणी आणि विठ्ठलमूर्तींवर पवमानाचा अभिषेक, भरजरी वस्त्रालंकारांची महापूजा, तुळस व फुलांच्या माळांनी सजलेल्या मूर्तीचे लोभस रूप डोळ्यांत साठवित मनोभावे दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या चेहऱ्यावरचे प्रसन्न भाव एकादशीचा आनंद द्विगुणित करत होते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com