राज्यातील भाजप सरकार बेशरम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

भोर - महिलांवरील अत्याचार वाढले असून, जनतेला असुरक्षित वाटत आहे. मात्र, राज्य सरकारला याची चिंता नाही. कारण हे सरकार बेशरम आहे. बुलेट ट्रेन जाऊ द्या, मुंबईची लोकल ट्रेन त्यांना नीट चालविता येत नाही, अशी टीका करून या सरकारला त्यांची जागा दाखवा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. 

भोर - महिलांवरील अत्याचार वाढले असून, जनतेला असुरक्षित वाटत आहे. मात्र, राज्य सरकारला याची चिंता नाही. कारण हे सरकार बेशरम आहे. बुलेट ट्रेन जाऊ द्या, मुंबईची लोकल ट्रेन त्यांना नीट चालविता येत नाही, अशी टीका करून या सरकारला त्यांची जागा दाखवा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. 

भोर नगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्त काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी बुधवारी (ता.११) आयोजित सभेत ते बोलत होते. माजी मंत्री अनंतराव थोपटे, आमदार संग्राम थोपटे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज साठे, जिल्हाध्यक्ष संजय जगताप, माजी अध्यक्ष देविदास भन्साळी, तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, महिलाध्यक्षा गीतांजली शेटे, दिलीप बाठे, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार निर्मला आवारे, नगरसेवकपदाचे उमेदवार पद्मिनी तारू, चंद्रकांत मळेकर, समीर सागळे, आशा रोमण, सचिन हर्णसकर, तृप्ती किरवे, रूपाली कांबळे, अमित सागळे, अमृता बहिरट, गणेश पवार, वृषाली घोरपडे, देविदास गायकवाड, सोनम मोहिते, अनिल पवार, स्नेहा पवार, आशा शिंदे व सुमंत शेटे आदी उपस्थित होते. 

चव्हाण यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. चव्हाण म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदींना आता ४३ वर्षांपूर्वीच्या आणीबाणीची आठवण झाली. त्यांनी गांधी परिवारावर टीका केली. कित्येक वर्षे देशाचा परिवार गांधी परिवाराने सांभाळला. परंतु, ज्यांना स्वतःचा परिवार नाही त्यांना परिवाराचे महत्त्व काय कळणार?  भोर नगरपालिकेतील काँग्रेसची सत्ता कायमच राहणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

माजी नगराध्यक्ष ॲड. जयश्री शिंदे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. उमेश देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. 

गुन्हेगारी वाढली...
काळा पैसा भारतात आणण्याच्या गोष्टी करणाऱ्या भाजप सरकारमुळे देशातील पांढरा पैसा मात्र परदेशात गेला. देशात अदृश्‍य आणीबाणी लागू झाली आहे. गेली तीन वर्षांत महाराष्ट्रात गुन्हेगारीचे प्रमाण ३८ टक्‍क्‍यांनी वाढले आहे, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: ashok chavan comment on BJP Government politics