चंद्रमौळी झोपडीतील कुटुंबाचा आधार हरपला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

सोमाटणे - अठरा विश्‍व दारिद्रय, २० गुंठे जमीन, चंद्रमौळी झोपडी, आईवडील वृद्ध, दोन चिमुकली मुले. पत्नी कमलसोबत मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. घर बांधायचे, मुलांना शिकवायचे, हे त्याचे स्वप्न होते. पण, नियतीच्या मनात वेगळेच होते. चार दिवसांपूर्वी हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाला आणि अर्ध्यावरती डाव मोडला. कुटुंबाचा आधारस्तंभ हरपला. येलघोलमधील अशोक घारे (वय ३२) या तरुणाची ही करुण कहाणी... 

वीस गुंठे शेतीचे दहा गुंठे माळरान आणि दहा गुंठे भात खाचर. त्यातून थोडेफार उत्पन्न मिळायचे. जोडीला मोलमजुरी करून कशीबशी गुजराण सुरू होती. राहण्यासाठी गवतापासून साकारलेली झोपडी, हेच त्यांचे घर. मुलगा आदित्य पहिलीत तर, मुलगी अबोली बालवाडीत शिकते. आपल्यासारखी गरिबी मुलांवर येऊ नये, यासाठी त्यांना खूप शिकवायचे, स्वतःच्या पायावर उभे करायचे, चांगले घर बांधायचे हे अशोक आणि कमल यांनी बघितलेले स्वप्न. ते साकारण्यासाठी दोघेही राबराब राबायचे. कुटुंबाची गरज भागवून थोडं पैसे मुलांच्या शिक्षणासाठी शिल्लक ठेवायचे, हा त्यांचा दिनक्रम. सरकारी योजनेतून घरकुल त्यांना मंजूर आहे. बांधकाम सध्या सुरू आहे. परंतु, चार दिवसांपूर्वी अशोक यांचे निधन झाले. स्वप्न भंगले. आदित्य व अबोलीच्या शिक्षणाचा प्रश्‍न निर्माण झालाय. आजी-आजोबाही नि:शब्द झालेत. नातवांचे भविष्य घडवायचे की सूनबाईच सांत्वन करायचे? अशा कात्रीत ते सापडले आहेत. आदित्य व अबोली मात्र, ‘आम्हाला खूप शिकायचंय, मोठ्ठे व्हायचंय’ असं सांगतात. त्या वेळी ऐकणाऱ्यांचे डोळे पाणावतात. या चिमुकल्यांसह त्यांच्या आजी-आजोबांना हवाय आर्थिक व मानसिक आधार.

Web Title: ashok ghare story