'पुलंच्या पुस्तकांतून जडणघडण'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

पुणे - ‘अभिनयातून जो विनोद सादर केला, त्याची जडणघडण पु. ल. देशपांडे यांच्या पुस्तकांवर अवलंबून आहे. त्यांच्या पुस्तकांमध्ये शाब्दिक विनोद कमी आहेत. पुलंनी मला काही शिकवले नाही; परंतु मी एकलव्याप्रमाणे त्यांची पुस्तके वाचून शिकत गेलो,’’ असे सांगत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी ‘पुलं’चे आपल्या जीवनातील स्थान अधोरेखित केले.

‘पु. ल. परिवार’ आणि आशय सांस्कृतिक यांच्या वतीने आयोजित पुलोत्सवात पुलंच्या चित्रपटांच्या पोस्टर्स प्रदर्शनाचे आणि चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन सराफ यांच्या हस्ते रविवारी झाले. या वेळी व्ही. शांताराम फाउंडेशनचे किरण शांताराम, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, उद्योजक कृष्णकुमार गोयल, महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार उपस्थित होते.

‘‘पुलंचे स्थान, लोकप्रियता कधीही विसरू देऊ नये. त्यांची आठवण सतत जागी ठेवली पाहिजे. पुलंची ताकद आजच्या पिढीला माहीत नाही, ती माहिती करून देण्याची गरज आहे. मराठी माणसाच्या आयुष्याला संजीवनी देणारी आपल्या महाराष्ट्रात पुलं आणि लता मंगेशकर अशी दोनच व्यक्तिमत्त्वं आहेत,’’ असेही सराफ यांनी दिलखुलासपणे सांगितले. या वेळी मगदूम, राजेभोसले यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सुप्रिया चित्राव यांनी केले.

पुलंच्या चित्रपटात काम करण्याची संधी हुकली
पुलंच्या ‘विदूषक’ चित्रपटासाठी मी काम करणार होतो; परंतु काही कारणांमुळे मला त्यात भूमिका करता आली नाही. त्यामुळे पुलंच्या चित्रपटात काम करण्याची माझी सुवर्णसंधी हुकली, अशी खंत सराफ यांनी व्यक्त केली.

Web Title: Ashok Saraf on Sunday inaugurated the posters exhibition and film festival of Pu La deshpande