मित्राला शुभेच्छा देण्यासाठी सायकलवरुन अष्टविनायकाची वारी

मिलिंद संगई
शुक्रवार, 22 जून 2018

बारामती - मैत्रीची परिभाषा आजवर अनेक अर्थांनी व्यक्त झाली, मात्र बारामतीत आपल्या सहका-याला शुभेच्छा देण्यासाठी अनेक मित्रांनी एकत्र येत सायकलवरुन अष्टविनायक यात्रा करत वेगळा पायंडा पाडला. 

बारामती - मैत्रीची परिभाषा आजवर अनेक अर्थांनी व्यक्त झाली, मात्र बारामतीत आपल्या सहका-याला शुभेच्छा देण्यासाठी अनेक मित्रांनी एकत्र येत सायकलवरुन अष्टविनायक यात्रा करत वेगळा पायंडा पाडला. 

बारामतीतील सतीश ननवरे हे ऑस्ट्रियामधील आयर्नमॅन स्पर्धेसाठी उतरले आहेत. ग्रामीण परिसरात सायकलींग, जलतरण व धावणे अशा तीन खडतर प्रकारातील स्पर्धेसाठी जाणारे ते पहिलेच बारामतीकर आहेत. ज्या बारामती सायकल क्लबमधून सतीश ननवरे सातत्याने सायकल चालवितात, त्या क्लबमधील सोळा सदस्यांनी नुकतीच चार दिवसांची तब्बल नऊशे कि.मी.चे अंतर अवघ्या चार दिवसात पूर्ण केले. उद्देश एकच...गणपती बाप्पाने सतीश याला त्याच्या स्पर्धेत यश मिळवून द्यावे अशी प्रार्थना करणे. काल सतीश व सपना ननवरे यांच्या हस्ते मोरगावच्या श्री मयुरेश्र्वराला आरती करुन या उपक्रमाचा शेवट झाला. उन, वारा व पाऊस यांची तमा न बाळगता आपल्या मित्राला शुभेच्छा देण्यासाठी ही यात्रा करणे हा एक वेगळाच भाग होता. 
नीलेश घोडके, रमेश इटकर, भागवत काटकर, रामहरी ठाकरे, हनुमंत क्षेत्री, अमर राऊत, सागर नाळे, सुरेश बोडरे, संजय दराडे, शैलेश गोंडे, अथर्व किर्वे, प्रतिक गाडे, अमोल जराड, अवधूत किर्वे, कपिल बोरावके व प्रकाश शितोळे हे सोळा जण आणि सतीश ननवरे यांचा मुलगा अभिषेक असे सतरा जण अष्टविनायक यात्रेत सहभागी झाले होते. दरम्यान रविवारी (ता. 24) या सर्वांचा सत्कार सायकल क्लबच्या वतीने करणार असल्याचे अँड. श्रीनिवास वायकर यांनी सांगितले. 
चौकट- परिश्रमाला सदिच्छांचे बळ....

सतीश ननवरे हा गेले वर्षभर आयर्नमॅन स्पर्धेसाठी खडतर परिश्रम करत आहे. जलतरण, सायकलींग व धावणे अशा तिन्ही प्रकारात तो कमालीची मेहनत घेत आहे. दहा तासात आयर्नमॅन स्पर्धा पूर्ततेचे त्याचे उद्दीष्ट आहे. त्याच्या परिश्रमाला आमच्या सदिच्छांचे बळ मिळावे या साठी अष्टविनायक यात्रा केल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले. 

 

Web Title: Ashtavinayaka Vary on bicycle to greet friend