आशियाई चित्रपट महोत्सव २४ पासून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

पुणे - आशय फिल्म क्‍लब आयोजित ९ वा ‘आशियाई चित्रपट महोत्सव’ २४ ते ३० डिसेंबरदरम्यान होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी पत्रकार परिषदेत दिली. पंधरा आशियाई देशांतील ४० हून अधिक चित्रपट दाखविले जाणार असून ‘माय मराठी’ या विभागात सात मराठी चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. 

‘आशय’चे वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार पत्रकार परिषदेस उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहयोगाने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय), फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया आणि एशियन फिल्म फाउंडेशन, मुंबई यांच्या सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 

हा महोत्सव राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे संपन्न होईल. दिवसातून सहा चित्रपट महोत्सवात दाखविण्यात येतील. ‘ऑफबीट बॉलिवूड’ या विभागात २०१७-१८ या वर्षातील काही वेगळ्या धाटणीचे चित्रपट दाखविण्यात येतील. ‘माय मराठी’ या विभागात गेल्या वर्षात गाजलेले आणि नव्याने प्रदर्शित होणारे सात मराठी चित्रपट रसिकांना पाहता येतील. गेल्या वर्षी राष्ट्रीय स्तरावर गाजलेले भारतीय प्रादेशिक भाषांतील म्हणजेच कन्नड, मल्याळम, बंगाली, आसामी, ओरिया व मणीपुरी अशा विविध भाषांमधील चित्रपट ‘इंडियन रिजनल सिनेमा’ या विभागात दाखविण्यात येतील. नवीन इराणी चित्रपट हे या महोत्सवाचे आणखी एक खास आकर्षण आहे. यंदाचे वर्ष बाबूजी, गदिमा आणि पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यांना आदरांजली म्हणून या त्रयींचा गाजलेला ‘संतपट’ या महोत्सवात दाखविण्यात येईल. या महोत्सवाच्या प्रवेशिका राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे १८ डिसेंबरपासून सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत उपलब्ध करण्यात येणार आहेत.

Web Title: Asian Film Festival