आता विधानसभेसाठी जोमाने काम करा - पवार 

बुधवार, 15 मे 2019

"राज्यात लोकसभा निवडणूक आपण ताकदीनिशी लढलो. पण ही लढाई आता संपली नाही. विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी नव्या जोमाने काम करा,'' असा सल्लावजा आदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मंगळवारी दिला. विरोधकांकडे संख्याबळ अधिक असले तरी, निवडणुकांना सामोरे जाण्याची क्षमता त्यांच्याकडे नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. 

पुणे - ""राज्यात लोकसभा निवडणूक आपण ताकदीनिशी लढलो. पण ही लढाई आता संपली नाही. विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी नव्या जोमाने काम करा,'' असा सल्लावजा आदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मंगळवारी दिला. विरोधकांकडे संख्याबळ अधिक असले तरी, निवडणुकांना सामोरे जाण्याची क्षमता त्यांच्याकडे नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. 

लोकसभा निवडणुकांनंतर आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर पवार यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या वेळी पक्षाचे शहराध्यक्ष चेतन तुपे, खासदार वंदना चव्हाण, आमदार जयदेव गायकवाड, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, महिला आघाडीच्या प्रमुख रूपाली चाकणकर, सुरेश घुले, युवक आघाडीचे राकेश कामठे आदी उपस्थित होते. सत्ताधारी भाजपचे निवडणूक धोरण, विरोधकांवर झालेला परिणाम, तरीही निवडणूक जिंकण्याचे तंत्र आणि लोकांमधील भावना आदी मुद्यांवर पवार यांनी भूमिका मांडली. 

पवार म्हणाले, ""सत्ताधाऱ्यांबाबत प्रचंड नाराजी आहे. ती लोकांपर्यंत पोचवून निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघांत आपली ताकद असून, ती टिकविण्यापुरते काम न करता वाढविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.''