सहपोलिस आयुक्त बोडखे यांना राष्ट्रपती पदक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

पुण्यातील निरीक्षक ढोमे, आवाड, दौंडचे पाठकही पदकाचे मानकरी

पुण्यातील निरीक्षक ढोमे, आवाड, दौंडचे पाठकही पदकाचे मानकरी
पुणे - स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला घोषणा करण्यात आलेल्या राष्ट्रपती पोलिस पदकांमध्ये पुणे शहरातील सहपोलिस आयुक्त शिवाजी बोडखे व चतुःशृंगी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. तर, "पीएमआरडीए'चे पोलिस उपायुक्त सारंग आवाड, दौंडच्या "एसआरपीएफ'चे कमांडंट श्रीकांत पाठक यांच्यासह विठ्ठल कुबडे, विठ्ठल मोहिते, दिगंबर जाखडे, चंद्रकांत इंगळे, किशोर अत्रे यांना पोलिस पदक जाहीर झाले आहे.

यापूर्वी नागपूरचे सहपोलिस आयुक्तपदी सेवा बजाविलेल्या व सध्या पुण्यात सहपोलिस आयुक्त म्हणून काम करणारे पदक विजेते बोडखे मूळचे नगरमधील पारगाव सुद्रीक गावचे रहिवासी आहेत. त्यांनी नागपूरसह लातूर येथे भूकंप पुनर्वसन, चंद्रपूरमध्ये नक्षलवादीविरोधी मोहीम व अन्य ठिकाणी कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी चोखपणे पार पाडली आहे. त्यांच्यासह पोलिस निरीक्षक ढोमे यांचाही राष्ट्रपती पदकाने गौरव होत आहे.

"पीएमआरडीए'चे पोलिस उपायुक्त सारंग आवाड, राज्य राखीव पोलिस दलाच्या दौंड येथील गटाचे कमांडर श्रीकांत पाठक यांना उल्लेखनीय सेवेबद्दल पोलिस पदक जाहीर झाले आहे. आवाड यांनी विविध ठिकाणी उत्तम कामगिरी केली आहे. पाठक हे पुणे पोलिस दलात विशेष शाखेत पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत होते. याबरोबरच चिंचवड पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक विठ्ठल कुबडे, मोटार परिवहन विभागातील पोलिस निरीक्षक विठ्ठल मोहिते, कोथरूड पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक दिगंबर जाखडे, गुन्हे शाखेतील पोलिस हवालदार चंद्रकांत इंगळे, बिनतारी संदेश विभागातील पोलिस उपनिरीक्षक किशोर अत्रे यांनाही पोलिस पदक जाहीर झाले आहे. उल्लेखनीय सेवेबद्दल सुधार सेवापदक येरवडा कारागृहातील सुभेदार कलप्पा मलकय्या कुंभार यांना जाहीर झाले आहे.

Web Title: Assistant Commissioner Shivaji Bodkhe President Award