''राष्ट्रीय स्वयंसेवक संघात तिरस्कार, फॅसिझमच विषवल्ली!''

Atamjit Singh
Atamjit Singh

पुणे : ''इतरांबद्दल तिरस्कार आणि फॅसिझम यांचीच विषवल्ली राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आजवर फोफावली आहे. किंबहूना तोच संघाचा पाया आहे !... संघाविषयी 'चांगले' काही सांगायचे तर एवढेच की, संघ तिरस्कार करण्याच्या बाबतीत कसलाही भेदभाव करत नाही. आपली विचारसरणी न मानणाऱ्या सर्वांसाठी तिरस्काराची भावना बाळगण्याची आगळी 'समानता' संघात पाहायला मिळते. 'हिंदुत्व' आणि 'राष्ट्रवाद' ही तर निमित्त आहेत विखारी विचार सर्वसामान्यांत पेरण्याचे...'' अशा शब्दांत पंजाबी नाटककार अतमजीत सिंग यांनी संघीय विचारसरणीचे 'बौद्धिक' उलगडले. 'राष्ट्रवादाची लस लावता येत नसते. 'घेतली आज लस आणि बनलो उद्या राष्ट्रवादी, असे होत नाही,' अशी चपराकही त्यांनी लगावली... 

जनसहयोग फाऊंडेशन आणि एस. एम. जोशी सोशालिस्ट फाऊंडेशनने आयोजिलेल्या 'विचारवेध संमेलना'च्या उद्घाटनप्रसंगी शुक्रवारी सिंग बोलत होते. 'भारताचा राष्ट्रवाद : संकल्पना, स्वरूप आणि आव्हाने' या विषयसूत्रावर हे तीन दिवसीय संमेलन बेतले आहे.

सिंग म्हणाले, ''खरेतर, सर्वसाधारण माणसे ही खऱ्या अर्थाने देशाप्रती सकारात्मक विचारांनी भारलेली आणि म्हणून त्या अर्थाने राष्ट्रवादीही असतातच. याउलट, कित्येकदा आपल्या खोट्या अन बेगडी देशभक्तीचे प्रदर्शन मांडत अनेक मोठे आणि प्रमुख्याने राजकीय विचारांनी प्रेरीत लोक हे त्यांना वाटतो तो अमानवी आणि 'सोयीस्कर राष्ट्रवाद' इतरांवर लादत असतात. सगळे सत्य फक्त आपल्याकडेच आहे, असे मानणाऱ्यांनी सत्य हे इतरत्रही असू शकते, हे समजून घ्यावे.'' 

सर्व धर्मांना महत्त्वाचे स्थान देणारा बादशाह अकबर, पाचवे शीख धर्मगुरू अर्जन देव अशा अनेकांची उदाहरणे आपल्या विवेचनात घेत सिंग यांनी 'धर्माचा दुर्गंध निर्माण करू पाहणाऱ्या काळात धर्माच्या सुगंधाचे महत्त्व' उपस्थितांपुढे विशद केले. 

'शुद्ध' काय आणि 'अशुद्ध' काय?
सिंग म्हणाले, ''आर्य समाजाच्या विचारसरणीत अपेक्षित असणाऱ्या 'शुद्धी' चळवळीकडे आजच्या 'घरवापसी' प्रमाणे पाहता येईल. या दोन्ही संकल्पनांत धर्मांतराचा विचार चुकीच्या अर्थाने मांडण्यात आला आहे. धर्मांतर झालेल्याने आपल्या धर्मात परत येण्याच्या विचारात काहीही वाईट नाही हे खरेच, मात्र असे असले तरी दुसरा धर्म वाईट ठरवणे हे चुकीचे आहे. धर्मांतराने माणूस हा काही अशुद्ध होत नसतो, कारण मुळात शुद्ध काय अन अशुद्ध काय याचे वस्तुनिष्ठ स्पष्टिकरण धर्मांतराच्या बाबतीत देताच येत नाही !''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com