गुगल प्रोग्रॅमिंगमध्ये अथर्व प्रथम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

पुणे - संगणक प्रणालीसाठी अत्यावश्‍यक ‘सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज’ हा अत्यंत आव्हानात्मक भाग असतो. याच प्रोग्रॅमिंगच्या स्पर्धेत पुण्याचा अथर्व जोशी (वय १७) जगात प्रथम आला आहे. जागतिक पातळीवर गुगल-यू-ट्यूबकडून फेब्रुवारी महिन्यात घेतलेल्या स्पर्धेत भारतासह अमेरिका, इंग्लंड, चीन, जर्मनी, स्वित्झर्लंड अशा  वीस देशांमधील आठ हजारांहून जास्त स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेच्या अंतिम निकालामध्ये ‘टॉप टेन’ क्रमवारीत अथर्व सर्वप्रथम आला. 

सॅलसबरी पार्क येथील दीक्षा महाविद्यालयात अथर्व बारावीत शिकतो आहे. सदाशिव पेठ येथे त्याचे वडील वैद्यकीय उपकरणे विक्री व्यवसाय करतात, तर आई बॅंकेत नोकरी करते. 

या स्पर्धेसाठी नेमकी कशी तयारी केली या संदर्भात ‘सकाळ’शी बोलताना अथर्व म्हणाला, ‘‘मला लहानपणापासून संगणकाबद्दल आकर्षण होते. संगणक नेमका कसा चालतो, त्याची भाषा कशी तयार होते, याची उत्सुकता होती. या परीक्षेसाठी मी आठवीपासून तयारी करीत होतो. प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज शिकण्यासाठी गणित विषय पक्का असला पाहिजे. यूट्यूब ट्युटोरिअल आणि बाजारातील पुस्तकांमधून ‘जावा, सी, सी प्लस प्लस, पायथन’ या भाषा शिकलो.’’ 

‘‘गुगल-यूट्यूबतर्फे ‘सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिक लॅंग्वेज’ अंतर्गत ‘ग्राफिक एनकोडिंग-डीकोडिंग’ ही जागतिक ऑनलाइन स्पर्धा वर्षातून एकदा होते. या परीक्षेसाठी किमान वय वर्षे १५ पूर्ण असावे लागते. शिक्षणाची कोणतीही अट नसते. ‘कोडशेफ’ या संकेतस्थळावर ही परीक्षा देता येते. सोपी, मध्यम आणि कठीण अशा तीन पातळ्यांवरील पाच प्रश्‍नांची उत्तरे द्यावी लागतात. अल्गोरिदम आणि डेटा स्ट्रक्‍चरवर आधारित वेगवान प्रोग्रॅमिंग करावे लागते. चार तासांच्या परीक्षेचा अंतिम निकाल मेलद्वारे मी ‘टॉप टेन’ क्रमवारीत प्रथम आल्याचे गुगल-यूट्यूबकडून सांगण्यात आले. मी भविष्यात नोकरी करणार नाही. मला संगणक क्षेत्रात स्वत-चा सॉफ्टवेअर व्यवसाय सुरू करायचा आहे.’’

अथर्वच्या यशाबद्दल त्याचे वडील महेश जोशी म्हणाले, ‘‘अथर्वला लहानपणापासून संगणकाची आवड होती. आठवीत असल्यापासून तो  यूट्यूब आणि विविध पुस्तकांमधून प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज शिकत होता. फेब्रुवारीत त्याने मध्यरात्री दोन ते पहाटे पाचच्या सुमारास ही परीक्षा दिली. त्यामध्ये तो जगात प्रथम आल्याचा मेल आला. तो आमच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण होता. त्याचा आम्हाला अभिमान आहे.’’

Web Title: Atharv Joshi First in Google Programming