बॅंकांकडून एटीएम सेंटर वाऱ्यावर

ATM
ATM

पिंपरी-  एटीएम फोडल्याबाबत दीड दिवसानंतरही बॅंकेला थांगपत्ता नाही, तर दुसऱ्या घटनेत एटीएम फोडून तब्बल महिना होत आला तरी त्यात रक्कम नसल्याने सेंटर बंद ठेवून बॅंकेने पोलिसांना कळविले नाही. यावरून बॅंकांनी त्यांचे एटीएम सेंटर वाऱ्यावर सोडून दिले असल्याचे दिसून येत आहे. 

मागील दहा दिवसांत चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीत एटीएम सेंटर फोडल्याच्या दोन घटना घडल्या. नेवाळेवस्ती येथील ॲक्‍सिस बॅंकेचे एटीएम फोडल्याची घटना सोमवारी (ता. ११) उघडकीस आली. त्यात आठ नोव्हेंबरला रक्कम जमा करण्यात आली होती. त्यानंतर दहा नोव्हेंबरला पहाटे हे एटीएम गॅस कटरने कापून यातील रोकड चोरट्यांनी लंपास केली. ही घटना तब्बल दीड दिवसानी म्हणजे ११ नोव्हेंबरला उघडकीस आली. दरम्यान, ही घटना एटीएम सुरक्षेसह देखभाल दुरुस्तीचे काम दिलेल्या संबंधित संस्थेच्या निदर्शनास का आली नाही, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

मंगळवारी (ता. १९) तळवडेतील रुपीनगर येथील आयडीबीआय बॅंकेचे एटीएम फोडल्याची घटना उघडकीस आली. हे एटीएम २३ ऑक्‍टोबरलाच फोडले असून, याबाबत बॅंक प्रतिनिधींनी पोलिसांना कळविण्याची तसदी घेतली नाही. दरम्यान, मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास पोलिस गस्त घालताना या एटीएमचा दरवाजा अर्धवट उघडा दिसला. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी पाहिले असता एटीएम गॅस कटरने कापलेले होते. या बाबत पोलिसांनी तत्काळ बॅंकेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर सकाळी दहा वाजता बॅंकेशी संपर्क साधला, त्या वेळी प्रतिनिधींना पाठवितो, असे सांगण्यात आले. मात्र, सायंकाळी चारपर्यंत प्रतिनिधी पोलिसांत तक्रार देण्यासाठी पोचले नव्हते. यावरून बॅंकांना त्यांच्या एटीएम सेंटरबाबत किती गांभीर्य आहे, हे दिसून येते. 

बहुतांश बॅंकांनी एटीएम सेंटरच्या सुरक्षेसह देखभाल दुरुस्तीचे काम खासगी संस्थांनी दिले आहे. या संस्थेमार्फतच सुरक्षारक्षक नेमले जातात. मात्र, अनेक एटीएमवर सुरक्षारक्षकच नसतात. 

सीसीटीव्हीसह सुरक्षारक्षक नेमण्याकडे दुर्लक्ष
एटीएम सेंटरच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हीसह सुरक्षारक्षक नेमणे आवश्‍यक आहे. या बाबत पोलिसांकडूनही बॅंकांना सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, बॅंका याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. यापूर्वी ज्या ठिकाणी एटीएम फोडल्याच्या घटना घडल्या. त्याठिकाणी सुरक्षारक्षकसह सीसीटीव्हीचाही ‘वॉच’ नसल्याचे समोर आले. 

लाखोंची रोकड लंपास
शहरात विविध बॅंकांचे सुमारे साडेपाचशे एटीएम सेंटर असून, मागील वर्षभरात एटीएम फोडल्याच्या सुमारे आठ घटना घडल्या. यात चोरट्यांनी लाखो रुपयांची रोकड लंपास केली. 

गॅस कटरचा वापर 
एटीएम फोडण्याच्या बहुतेक गुन्ह्यांत गॅस कटरचा वापर करण्यात आला असून, चोरटे एटीएमवर चोरी पहाटे करीत असल्याचेही दिसून येते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com