एटीएममध्ये खडखडाट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

पुणे - दोन टक्के वेतनवाढ मिळावी, या मागणीसह केंद्र सरकारच्या आर्थिक सुधार आणि इंद्रधनुष्य योजनांमुळे बॅंकिंग क्षेत्रावर होणाऱ्या संभाव्य दुष्परिणामांकडे लक्ष वेधण्यासाठी सार्वजनिक, खासगी आणि सरकारी बॅंकांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून संप पुकारला होता. परिणामी शहर परिसरातील विविध बॅंकांच्या एटीएममध्ये खडखडाट असल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. 

देशातील नऊ विविध बॅंक कर्मचारी संघटनांनी हा संप पुकारला होता. यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील काही बॅंकांची एटीएम रोख रकमेअभावी बंद होती. त्यामुळे नागरिकांना रोख रकमेसाठी धावपळ करावी लागली. हॉस्पिटल, औषधांची दुकाने, हॉटेल, दुकाने आणि अन्य ठिकाणी डेबिट व क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केले जात असल्याचे दिसून आले. काही नागरिकांनी धनादेश व धनाकर्ष देण्याघेण्याचे व्यवहार पुढे ढकलले. दरम्यान, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्यात आल्याचे बॅंक प्रशासनाकडून सांगण्यात आले.

बॅंक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे धनादेश वटविण्यास अडचणी येत आहेत. विशेषतः ज्यांचे कामकाज धनादेशावर अवलंबून आहे, त्यांना या संपाचा सर्वाधिक फटका बसला आहे.  
- गिरीश लांडगे, विमा सल्लागार.

दोनदिवसीय संपामुळे हॉटेल व्यवसायावर परिणाम झाला. रोख व्यवहाराऐवजी कार्ड पेमेंट करण्याला नागरिकांनी पसंती दिली. बाजारपेठेत माल खरेदीचे आमचे दैनंदिन व्यवहार रोख होऊ शकले नाहीत.
- दशरथ पाटील, हॉटेल व्यावसायिक

बाजारातील खरेदी-विक्रीचे व्यवहार रोख रकमेअभावी होऊ शकले नाहीत. शाळांच्या प्रवेशाला एक जूनपासून सुरवात होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मुलांसाठी शालेय साहित्य खरेदी होऊ शकली नाही. 
- ज्योती कुलकर्णी, गृहिणी

Web Title: ATM Empty Bank Employee Strike