टाकाऊपासून एटीएम रोबो (व्हिडिओ)

संदीप घिसे
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

पिंपरी - यात्रेच्या ठिकाणी नेता येईल आणि चोरांपासून स्वसंरक्षण करेल, अशा बॅटरीवर चालणाऱ्या रोबोला राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात दुसरा, तर पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या काळेवाडी येथील शाळेतील सहावीच्या विद्यार्थ्याने टाकाऊ वस्तूंपासून सौरऊर्जेवर चालणारा हा रोबो तयार केला आहे.

पिंपरी - यात्रेच्या ठिकाणी नेता येईल आणि चोरांपासून स्वसंरक्षण करेल, अशा बॅटरीवर चालणाऱ्या रोबोला राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात दुसरा, तर पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या काळेवाडी येथील शाळेतील सहावीच्या विद्यार्थ्याने टाकाऊ वस्तूंपासून सौरऊर्जेवर चालणारा हा रोबो तयार केला आहे.

एटीएम चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी महापालिकेच्या काळेवाडी येथील शाळेतील सहावीचा विद्यार्थी नीलेश उमेश पांडे याने रोबो तयार केला आहे. १४ आणि १५ डिसेंबरला बालेवाडी येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च (आयसर) संस्थेने ‘जिज्ञासा- २०१८’ विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते. त्यात अडीच हजार प्रकल्पांची नोंदणी झाली होती. त्यापैकी पाचवी ते आठवीतील २० प्रकल्प, आठवी ते दहावीतील ८६ प्रकल्प आणि शिक्षण विभागातील २० असे एकूण १२६ प्रकल्प सादर करण्यात आले. त्यामध्ये नीलेशने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला.

जुन्या खेळण्यापासून हा रोबो-एटीएम तयार केला आहे. रोबोसाठी खेळण्यातील जुनी वाहने वापरली आहेत. बॅटरी चार्ज करण्यासाठी सौरऊर्जा, पवनचक्‍कीचा वापर केला आहे. रोबोची उंची ६२ सें.मी. असून, वजन दीड किलो आहे. रोबोमध्ये २० कॉइन बसू शकतात. हा रोबो तयार करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागला. या रोबोमध्ये काही बदल केल्यास चोरांपासून हा स्वसंरक्षण करू शकतो, तसेच एटीएम बाजूला केल्यास या रोबोकडून शेतीची कामेही करून घेता येतील, असेही नीलेशने सांगितले.

नीलेशचे वडील समोसा विक्रीचे काम करतात. आई गृहिणी आहे. मुख्याध्यापिका सुरेखा भालचीम, वर्गशिक्षिका शुभांगी पवार, सुनंदा चव्हाण आणि सुरेखा शिरसाट यांनी नीलेशबाबत अगस्त इंटरनॅशनल फाउंडेशनचे शरद कासार यांना सांगितले. 

नीलेशच्या पालकांची आर्थिक स्थिती बेताची आहे. त्यास उच्चशिक्षण देण्याचा पालकांचा मानस आहे. त्यास भविष्यात योग्य मार्गदर्शन मिळाल्यास तो शाळेचे आणि आपल्या पालकांचे नाव नक्‍कीच उज्ज्वल करेल.
- सुरेखा भालचीम, मुख्याध्यापिका

Web Title: ATM Robo making by Scrab Goods