एटीएममधून आता 50 रुपयांच्या नोटा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

मुंबई - पाचशे आणि हजारच्या नोटा बदलण्यासाठी उद्या (ता. 10) होणारी गर्दी लक्षात घेऊन रिझर्व्ह बॅंकेने प्रत्येक बॅंक शाखेला दोन ते तीन कोटी मूल्याच्या 50 आणि 100 च्या नोटांची रसद पुरवली आहे. एटीएममधील सॉफ्टवेअरमधील 500, हजारच्या नोटांचे तपशील काढून तेथे 50 च्या नोटांचे तपशील भरण्यात आले आहेत. त्यामुळे आता एटीएममधून 50 च्या नोटाही ग्राहकांना मिळणार आहेत, अशी माहिती बॅंकांतील सूत्रांनी दिली. 

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी बॅंक कर्मचाऱ्यांनी दिवसभर काम केले. एटीएममधील 500, हजारच्या नोटा काढून त्या रिझर्व्ह बॅंकेकडे पाठवण्यात आल्या. रिझर्व्ह बॅंकेने तेवढ्याच मूल्याच्या 100, 50 च्या नोटा बॅंकांना दिल्या. प्रत्येक नोटीचा आकार आणि वैशिष्ट्यांची नोंद एटीएममध्ये केलेली असते. ग्राहकांच्या सूचनेनुसार नोट बाहेर येते. सॉफ्टवेअरमधील तपशील बदलण्यासाठी एटीएम बंद ठेवण्यात आले आहेत. आता एटीएममध्ये 50 च्या नोटा भरण्यात आल्या आहेत. 500 आणि दोन हजारांच्या नव्या नोटांसाठी पुन्हा बदल करण्यात येणार आहे. एटीएमची व्यवस्था पाहणारी कंपनी एनसीआर इंडियाच्या विक्रोळी कार्यालयात वॉररूम तयार करण्यात आला होती. परदेशी तज्ज्ञांचेही मार्गदर्शन घेण्यात आले. 

आज बॅंका उशिरापर्यंत सुरू 

बॅंक शाखेतील व्यवहारांनुसार 60 लाख ते तीन कोटींपर्यंत कमी मूल्यांच्या नोटा पुरविण्यात आल्या आहेत. बदललेल्या नोटांचा तपशील रिझर्व्ह बॅंकेला देण्यात येणार आहे. उद्या बॅंक शाखेत ग्राहक असेपर्यंत कामकाज सुरू राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

सरकारच्या निर्णयाने नागरिकांनी घाबरू नये. कायदेशीर मार्गाने कमावलेला पैसा कुठेही जाणार नाही. काही दिवसांपुरता हा प्रश्‍न असेल. एटीएममधून ग्राहकांची पैशांची दैनंदिन गरज पूर्ण केली जाईल. 

- नवरोझ दस्तुर, व्यवस्थापकीय संचालक, एनसीआर इंडिया

Web Title: ATMs from Rs 50 notes