मुलाला मारण्याची धमकी देऊन महिलेवर अत्याचार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

पुणे - फेसबुक अकाउंटवरून महिलेचा शोध घेऊन मुलाला जिवे मारण्याची धमकी देत एकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ही घटना हडपसर परिसरात घडली. आरोपीने पेनमधील छुप्या कॅमेऱ्याने अत्याचाराचे चित्रीकरण सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत शरीरसंबंधाची मागणी केली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

याप्रकरणी एका 48वर्षीय महिलेने फिर्याद दिली. शकील खलिल शेख (वय 38) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडित महिला नाशिक येथील असून, ती विवाहित आहे. आरोपी शकील शेखही नाशिकचा असून, त्या महिलेच्या पतीचा मित्र आहे. त्यामुळे त्यांची एकमेकांसोबत ओळख झाली. पतीसोबत वाद झाल्यामुळे ती काही दिवसांपासून वेगळी राहत होती. त्याचा गैरफायदा घेत त्याने तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली; परंतु तिने नकार दिला. त्याच्या त्रासाला कंटाळून ही महिला चार महिन्यांपूर्वी मुलासमवेत पुण्यात राहण्यास आली. 

या महिलेच्या मुलाचे फेसबुक अकाउंट आहे. आरोपीने ते पुण्यात कोठे राहतात, याची माहिती घेतली. तो 21 एप्रिल रोजी महिला काम करीत असलेल्या कंपनीत गेला. तेथे मुलाला जिवे मारण्याची धमकी दिली. त्याने तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतरही तो सतत धमकी देत होता. त्यामुळे पीडित महिलेने हडपसर पोलिस ठाणे गाठले. त्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. 

Web Title: Atrocities against the woman by threatening to kill the child