भाजप नगरसेविकेच्या कार्यालयाची तोडफोड

पांडुरंग सरोदे
शनिवार, 15 जून 2019

- भारतीय जनता पक्षाेेच्या एका नगरसेविकेच्या कार्यालयाची तोडफोड
- पतीला धारदार शस्त्रे दाखवून धमकाविले
-  भिमराव साठे( वय 42,रा.कात्रज-कोंढवा) यांनी दिली तक्रार
- भिमराव साठे यांच्या पत्नी वर्षा साठे या नगरसेविका आहेत

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या एका नगरसेविकेच्या कार्यालयाची तोडफोड करुन त्यांच्या पतीला धारदार शस्त्र दाखवून धमकाविण्यात आले. हा प्रकार अप्पर इंदिरानगर येथे शुक्रवारी रात्री घडला.

 याप्रकरणी बसवेश्‍वर ख्याले(वय 24),किरण बबन जाधव(वय 32), मंगेश रमेश हांडे(वय 24, सर्व रा.बिबवेवाडी) यांच्याविरुद्ध बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भिमराव साठे( वय 42,रा.कात्रज-कोंढवा) यांनी तक्रार दिली आहे.

भिमराव साठे यांच्या पत्नी वर्षा साठे या नगरसेविका आहेत. त्यांचे अप्पर इंदिरानगर येथे जनसंपर्क कार्यालय आहे. तेथे त्यांचे कार्यकर्ते नितीन साठे, सुरज आंब्रे, अण्णा उघडे व दिपक धडे हे उपस्थित होते. त्यावेळी आरोपी तेथे घुसले. त्यांनी " तुमचे साहेब कोठे आहेत, त्यांचा नंबर द्या" असे म्हणत कार्यालयातील टेबलाची काच फोडली. यानंतर कार्यकर्त्यांना हाताने मारहाण केली. यातील बसवेश्‍वर ख्याले याने "माझ्याकडे पाहत नाही तुमच्याकडे बघुन घेतो" अशी धमकी दिली. यानंतर पुन्हा संध्याकाळी बसवेश्‍वर धारदार हत्यार घेऊन कार्यालयात आला. त्याने फिर्यादी भिमराव साठे यांना भिती दाखवण्याच्या उद्देशाने त्यांचे दार ठोठावून दुचाकीवरुन पळ काढला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक पी.एम.वाघमारे करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: attack on BJP corporator's office in Appar indira nagar at pune