डॉक्‍टरांवरील हल्ले हे गैरसमजातून; डॉक्‍टरांची भावना 

दीपेश सुराणा
शनिवार, 30 जून 2018

पिंपरी (पुणे) : डॉक्‍टरांवर होणारे हल्ले हे गैरसमजातून होतात. कशाही परिस्थितीत रुग्ण बराच झाला पाहिजे, ही भूमिका बदलायला हवी. रुग्णाला बरे करण्यासाठी डॉक्‍टर सर्वोत्तम प्रयत्न करीत असतात. रुग्ण व डॉक्‍टरांमध्ये सुसंवाद वाढल्यास डॉक्‍टरांना किंवा रुग्णालयाला सुरक्षा पुरवावी लागणार नाही, असे मत शहरातील डॉक्‍टरांच्या विविध संघटनांच्या अध्यक्षांनी शनिवारी "दै.सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. 

पिंपरी (पुणे) : डॉक्‍टरांवर होणारे हल्ले हे गैरसमजातून होतात. कशाही परिस्थितीत रुग्ण बराच झाला पाहिजे, ही भूमिका बदलायला हवी. रुग्णाला बरे करण्यासाठी डॉक्‍टर सर्वोत्तम प्रयत्न करीत असतात. रुग्ण व डॉक्‍टरांमध्ये सुसंवाद वाढल्यास डॉक्‍टरांना किंवा रुग्णालयाला सुरक्षा पुरवावी लागणार नाही, असे मत शहरातील डॉक्‍टरांच्या विविध संघटनांच्या अध्यक्षांनी शनिवारी "दै.सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. 

रविवारी (1 जुलै) असलेल्या "डॉक्‍टर्स डे' निमित्त त्यांच्याशी साधलेला हा संवाद. डॉ. संजीव दात्ये (अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड डॉक्‍टर असोसिएशन) : रुग्णाने डॉक्‍टरकडे गेल्यानंतर त्यांच्यावर पूर्ण विश्‍वास ठेवावा. रुग्ण हा आमच्या दृष्टीने देव आहे. त्यांना मदत करण्यासाठी आम्ही शंभर टक्के तयार आहोत. रुग्णांची मानसिकता बदलल्यास डॉक्‍टरांच्या सुरक्षेचा प्रश्‍नच उद्‌भवणार नाही. रुग्ण दगावणे, आर्थिक अडचण ही हल्ल्यामागे प्रमुख कारणे असतात. डॉक्‍टरांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे, रखवालदार असावे. रुग्णांबरोबर झालेल्या संवादाचे रेकॉर्डिंग ठेवावे. 

डॉ. सत्यजित पाटील (अध्यक्ष, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, पिंपरी-चिंचवड) : कोणत्याही परिस्थितीत मी बरे व्हायलाच हवे, ही रुग्णांची भूमिका अयोग्य वाटते. रुग्णाला वाचविण्याचा प्रयत्न डॉक्‍टर करीत असतात. मात्र, उपचार सुरू असताना चुकून रुग्ण दगावला तर सर्व दोषारोप डॉक्‍टरांवर करणे योग्य ठरणार नाही. इतर ठिकाणी शांत राहणारा समाज डॉक्‍टरांवर मात्र, हल्ले करताना मागे-पुढे पाहत नाही. पैसे मोजले की रुग्ण वाचेल, ही मानसिकता बदलली पाहिजे. रुग्ण दगावण्याची विविध कारणे असतात. त्याचा शोध घेतला पाहिजे. 

डॉ. धनराज हेळंबे (अध्यक्ष, फॅमिली फिजिशियन असोसिएशन, पिंपरी-चिंचवड) : फॅमिली डॉक्‍टर ही संकल्पना कमी होत चालली आहे. त्यामुळे डॉक्‍टर आणि रुग्ण यांच्यातील संवाद दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. रुग्णांच्या अपेक्षा वाढत चालल्या आहेत. डॉक्‍टरांकडे हवी ती साधनसामग्री उपलब्ध नसते. त्यामुळे रुग्णांवर उपचार करताना मर्यादा येतात. त्यातून हल्ल्यांसारखे प्रकार होतात. डॉक्‍टर व रुग्णाने सुसंवाद ठेवल्यास या गोष्टी कमी होऊ शकतात. डॉक्‍टरांनी देखील रुग्णाला वेळ दिला पाहिजे. 

डॉ. नंदकुमार माळशिरसकर (अध्यक्ष, भोसरी जनरल प्रॅक्‍टिशनर्स असोसिएशन) : समाजात रुग्णांच्या मनातील गैरसमज दूर करायला हवे. डॉक्‍टरांच्या देखील काही मर्यादा आहेत. रुग्णांची मानसिकता असते की रुग्ण हा बरा व्हायलाच हवा. अन्य व्यवसायांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींवर हल्ले होत नाहीत मग डॉक्‍टरांच्या बाबतीत असे का घडते, याबाबत विचारमंथन व्हायला हवे. डॉक्‍टरांनी सांगितलेल्या विविध चाचण्या रुग्णांना अनावश्‍यक वाटतात. काही वेळा या चाचण्या आवश्‍यक असतात. त्यामुळे त्या कराव्या लागतात. 

Web Title: attack on doctors is from understanding feelings of doctors