सराफी दुकानातील कर्मचाऱ्यावर हल्ला

येवलेवाडी - श्री गणेश ज्वेलर्स या दुकानात हल्लेखोरांनी हल्ला केल्यानंतर पाहणी करताना पोलिस.
येवलेवाडी - श्री गणेश ज्वेलर्स या दुकानात हल्लेखोरांनी हल्ला केल्यानंतर पाहणी करताना पोलिस.

पुणे/गोकूळनगर - येवलेवाडी येथील श्री गणेश ज्वेलर्सच्या दुकानात घुसून हल्लेखोरांनी भरदिवसा एका कर्मचाऱ्यावर पिस्तुलातून जवळून गोळी झाडली. त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने येवलेवाडीत खळबळ उडाली. अमृत परिहार (वय २७, रा. मूळ राजस्थान) असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. 

येवलेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ हे दुकान आहे. या दुकानाचे मालक मानसिंग देवडा हे त्यांच्या आजीचे निधन झाल्यामुळे राजस्थानमध्ये गावी गेले आहेत. त्यामुळे दुकानातील व्यवहार त्यांचा विश्‍वासू कर्मचारी अमृत परिहार बघत होता. आज दुपारी दीडच्या सुमारास चार जण दुकानात आले. ते अमृतशी बोलत होते. त्यापैकी एकाने जवळून पिस्तुलातून त्याच्यावर गोळी झाडली. गोळी छातीत उजव्या बाजूला लागल्यामुळे अमृत जागीच कोसळला. गोळी झाडल्यानंतर हल्लेखोर येवलेवाडीच्या मागील बाजूने कात्रजच्या दिशेने पसार झाले. 

अमृतला गंभीर जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर ससून रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्याची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त शिरीष सरदेशपांडे, सहायक आयुक्‍त समीर शेख, कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पाटील, दरोडा प्रतिबंधक पथकाचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कदम घटनास्थळी दाखल झाले.

थरार सीसीटीव्हीत कैद
हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबाराचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. त्यात हल्लेखोर जवळून अमृतवर गोळी झाडत असल्याचे दिसून येत आहे. हल्लेखोरांपैकी दोघांच्या हातात पिस्तूल होते. त्यापैकी एकाने तोंडाला रुमाल बांधलेला होता. 

याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून हल्लेखोरांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. हल्लेखोरांना पोलिस लवकरच अटक करतील. 
- अनिल पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोंढवा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com