पुणे : महाविद्यालयातील भांडणातून तरुणाच्या घरावर हल्ला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

- तरूणाच्या भावासह मित्रांना मारहाण, वाहनांची तोडफोड

पुणे : महाविद्यालयात झालेल्या भांडणाच्या रागातून पंधरा ते वीस जणांच्या टोळक्याने रात्रीच्या सुमारास एका तरुणाच्या घराजवळ येऊन दगडफेक करीत वाहनांची तोडफोड केली. तसेच तरूणाच्या भावावर हल्ला केला. ही घटना विमाननगर येथील विमानतळ रस्त्यावरील संजय पार्क वसाहत परिसरात मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

ऋषिकेश गाडे (वय १९), अतुल यशवदे (वय १९),राहुल कासतोडे (वय २५, तिघेही रा. म्हाडा कॉलनी, विमाननगर) यांच्यासह विजय कांबळे (वय १९, रा. कलवडवस्ती, लोहगाव) यांना अटक केली. तर त्यांच्यासह इतर १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी किरण आढाव (वय २६,  रा. संजयपार्क वसाहत, विमाननगर) याने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व संजय पार्क वसाहतीमध्ये राहत असलेल्या एका तरूणाचे महाविद्यालयात भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरून 15 ते 16 जणांचे टोळके हातात तलवार, हॉकीस्टिक घेऊन फिर्यादीच्या घराजवळ आले.

आरोपींनी फिर्यादीस घराबाहेर बोलावून घेतले. तसेच त्याचा भाऊ राकेश आढाव, त्यांचा मित्र किरण शिंगाडे यांना मारहाण केली. त्यानंतर परिसरात उभ्या केलेल्या वाहनांची तोडफोड केली. तलवार हवेत फिरवून तसेच फिर्यादीच्या मदतीसाठी येणार्या नागरिकांच्या दिशेने दगड फेकून परिसरात दशहत निर्माण केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attack on a youths house after college dispute