डॉक्टरांवर होणारे हल्ले चिंताजनक - डॉ. संचेती

डॉ. समीर तांबोळी
सोमवार, 23 एप्रिल 2018

वैद्यकीय व्यवसायात कट प्रॅक्टीस सारख्या वाईट गोष्टी त्वरीत थांबल्या पाहिजेत अशी अपेक्षा डॉ. संचेती यांनी यावेळी व्यक्त केली.

उंड्री - 'डॉक्टरांवरील हल्ले दिवसेंदिवस वाढत असून ही समाजाच्या दृष्टेने गंभीर बाब आहे. इतर कुठल्याही व्यवसायापेक्षा डॉक्टर, तसेच हॉस्पिटलच्या विरुद्ध ग्राहक संरक्षण कायद्याचा वापर आधिक केला जातोय.  त्याचा परिणाम आज डॉ. तणावाखाली काम करत आहेत.' अशी खंत डॉ. के. एच संचेती यांनी व्यक्त केली. पिसोळीतील ब्रम्हकुमारी इश्वरीय विद्यालय जगदंबा भवन येथे 'रिज्युव्हिनेटींग मेडिकल माईंड' वैद्यकीय व्यावसायिकांच्या एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

डॉ. संचेती पुढे म्हणाले, 'वैद्यकीय व्यवसाय अन्य व्यवसायापेक्षा (वकील, इंजिनिअर वैगेरे) तुलनेने वेगळा व सेवाभावी आहे. कारण त्याचा संबंध माणसाचे शरीर व मन याच्याशी येतो. या सेवेतून मिळणारे समाधान आध्यात्मिक असते.' वैद्यकीय व्यवसायात कट प्रॅक्टीस सारख्या वाईट गोष्टी त्वरीत थांबल्या पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

वैद्यकीय व्यवसाय करत असताना येणारी मनाची पठारावस्था, मरगळ दुर करणे. पुन्हा नव्या जोमाने काम सुरु करणे या दृष्टीने राजयोग, विपश्यनेचे महत्व ही या परिषदेची मुख्य थीम होती. या परिषदेत डॉ. अशोक मेहता यांचे 'विहासा' (वैद्यकीय व्यवसायातील मुलतत्वे - आध्यात्मिक संबंध), डॉ. सचिन परब यांचे 'सोल' (सिक्रेट्स ऑफ अल्टीमेट लिव्हींग- जीवनशैली), डॉ. मनोज मतनानी यांचे स्ट्रेस-डिस्ट्रेस (राजयोगाच्या सहाय्याने ताण तणाव मुक्ती), डॉ. रतन राठोड यांचे 'कॅड' (हृदय रोगापासून बचाव), डॉ. सुप्रिया गुगळे यांचे गर्भसंस्कार या विषयावर व्याख्याने झाली. 

परिषदेचे उद्घाटन डॉ. संचेती यांनी दिपप्रज्वलन करून केले. याप्रसंगी ए. एफ. एम. सी. च्या अधिष्टाता मे. ज. माधुरी कानिटकर, डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सी. इ. ओ ब्रिगेडिअर अमरजितसिंह, एचव्ही देसाई नेत्ररुग्णालयाचे सीएमडी मदन देशपांडे, डॉ.संजय देवधर, डॉ. पद्मा अय्यर,डॉ. राजेश माने, डॉ. अशोक मेहता, डॉ. सचिन परब, जगदंबा भवनच्या सुनंदा दिदि, दशरथभाई यांची प्रमुख उपस्थिती होती. या परिषदेकरिता पुणे शहर तसेच महाराष्ट्रातील विविध भागातून, वैद्यकीय व्यावसायिक, तसेच व्यवसायाशी संबधीत नागरिक उपस्थित होते. जगदंबा भवनच्या प्रमुख सुनंदा दिदी यांनी उपस्थितांना ब्रम्हकुमारी इश्वरीय विद्यालयाचे सदस्य बनण्याचे आवाहन केले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The attacks on the doctors are alarming says dr sancheti