मुसेवाला प्रकरणातल्या आरोपीचा खंडणी उकळण्याचा प्रयत्न; व्यावसायिकाला दिली धमकी

गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधीत संतोष जाधव याने नारायणगाव येथील एका व्यावसायिकाकडून दरमहा 50 हजार रुपयांची खंडणी मागितली.
Santosh jadhav
Santosh jadhavSakal
Summary

गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधीत संतोष जाधव याने नारायणगाव येथील एका व्यावसायिकाकडून दरमहा 50 हजार रुपयांची खंडणी मागितली.

नारायणगाव/पुणे - पंजाबी गायक सिद्धु मुसेवाला खुन प्रकरणातील संशयित आरोपी व गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधीत संतोष जाधव याने नारायणगाव येथील एका व्यावसायिकाकडून दरमहा 50 हजार रुपयांची खंडणी मागितली. व्यावसायिला जीवे मारण्याची धमकीही त्याच्या साथीदाराने दिल्याच्या प्रकरणाची ग्रामीण पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत जाधवच्या सात साथीदारांना बेड्या ठोकल्या. त्याचबरोबर त्यांच्याकडून तब्बल 13 पिस्तुल, एक बुलेट कॅरीअर, मॅक्‍झीन व वाहने असा मुद्देमाल केला.

वैभव शांताराम तिटकारे (रा.चिखली,आंबेगाव), रोहित विठ्ठल तिटकारे, सचिन बबन तिटकारे (दोघेही रा.नायफड, खेड), जिशान इलाहीबक्ष मुंढे , जयेश रतिलाल बहिरम (दोघेही रा. घोडेगाव, आंबेगाव), जीवन सिंग दर्शनसिंग नहार, श्रीराम रमेश थोरात (दोघेही रा. मंचर, आंबेगाव) अशी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पथक व नारायणगाव पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष जाधव याने सहा महिन्यापूर्वी नारायणगाव येथील वॉटल प्लांट व्यावसायिकास व्यावसायिकास व्हॉटस्‌अपद्वारे फोन करुन 50 हजार रुपयांची खंडणी मागितली होती. त्यानंतर व्यावसायिकास गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याने त्याच्या साथीदाराला व्यावसायिकाकडे पाठवून त्याच्याद्वारेही धमकी दिली होती. मात्र या प्रकारामुळे व्यावसायिक घाबरले होते. दरम्यान, सिद्धु मुसेवाला खुन प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी जाधव यास गुजरातमधून अटक केली. त्यास अटक केल्यामुळे व्यावसायिकास धीर आल्याने त्यांनी तत्काळ नारायणगाव पोलिस ठाण्यात खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून जाधवच्या साथीदारांना अटक करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार, पोलिसांनी अटकेत असलेल्या जाधवकडे खंडणीप्रकरणातील इतर साथीदारांबाबत चौकशी केली. तेव्हा, जाधवच्या सांगण्यावरुन खंडणी मागणाऱ्या जीवनसिंग नहार, श्रीराम थोरात यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल, तीन मोबाईल जप्त केले. त्यानंतर जाधव याने जयेश बहिरम व इतर साथीदारांना मध्यप्रदेशमध्ये गावठी पिस्तुलाचा साठा आणण्यासाठी पाठविले असल्याची महत्वपुर्ण माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी पुन्हा वैभव तिटकारे, रोहित तिटकारे, सचिन तिटकारे, जिशान मुंढे यांनाही अटक केली. अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी गावठी पिस्तुल, काडतुसे व अन्य साहित्य जप्त केले. उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके , सहाय्यक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे, पृथ्वीराज ताटे, किरण भालेकर, हवालदार दिपक साबळे, राजू मोमीन , विक्रम तापकीर , संदीप वारे , अक्षय नवले यांच्या पथकाने हि कारवाई केली.

बिष्णोई टोळीप्रमाणे जाधवकडून तरुणांवर समाजमाध्यमांची मोहिनी

गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोई टोळीतील गुन्हेगार आपले वर्चस्व दाखविण्यासाठी फेसबुक, ट्‌विटर, इन्स्टाग्राम अशा समाजमाध्यमांवर त्यांचे गुन्हे, शस्त्रांचा वापर व आणि दहशतीबाबतचे व्हिडीओ प्रसारीत करुन तरुणांना आकर्षित करते. त्याच पद्धतीने जाधवनेही आपल्या दहापेक्षा जास्त समाजमाध्यम खात्यांमधून त्याच्या गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे रिल्स बनविणे, व्हिडीओ प्रसारीत करण्याचा प्रकार केला आहे. पोलिसांनी आत्तापर्यंत 100 हुन अधिक समाजमाध्यम खात्यांची पडताळणी केली आहे. त्याद्वारे तो तरुणांना गुन्हेगारीमध्ये ओढण्याचा प्रयत्न करतो, पितृछत्र हरपलेल्या मुलांना आणि 12 ते 18 या वयोगटातील तरुणांना तो त्याच्या टोळीत ओढत आहे.

'जाधव व त्याच्या गुन्हेगारी टोळीचा बिमोड केला आहे. जाधव याने खंडणी घेतली असेल किंवा वसुलीबाबत कोणाला धमकी दिले असेल, तर त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क करावा. जाधवच्या समाजामाध्यम खात्याकडे अनेकदा उच्चशिक्षित, चांगल्या कुटुंबातील मुलेही आकर्षित होतात. त्याच्या फोटो, व्हिडीओ, फेसबुक पेजला लाईक, फॉलो किंवा कमेंट करण्याचे प्रकार अनेकांनी केले आहेत. मात्र त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे योग्य नाही. त्यामुळेच अशा मुलांच्या, तरुणांच्या पालकांचे समुपदेशन करून त्यांच्या मुलांना वाईट संगतीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जाणार आहे.'

- डॉ.अभिनव देशमुख, पोलिस अधिक्षक, पुणे ग्रामीण पोलिस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com