विद्यार्थ्यांची हजेरी आता तीनवेळा!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 जून 2018

विद्यार्थी शाळेत असताना त्याच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी शाळेची असेल. तसेच विद्यार्थ्यांची हजेरीही तीन वेळा नोंदवायची आहे. 

पुणे : शालेय विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना आता महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने तयार केलेल्या "चिराग ऍप'ची माहिती विद्यार्थ्यांना देणे बंधनकारक आहे. विद्यार्थी शाळेत असताना त्याच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी शाळेची असेल. तसेच विद्यार्थ्यांची हजेरीही तीन वेळा नोंदवायची आहे. 

राज्यातील सर्व माध्यमाच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांसाठी राज्य सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. विद्यार्थ्यांची सुरक्षितता हा त्यामागील हेतू आहे. त्यानुसार प्रत्येक शाळेत तक्रार पेटी, पुरेसे सीसीटीव्ही कॅमेरे, प्रवेशद्वाराजवळ महिला वा पुरुष सुरक्षारक्षक नेमावे लागणार आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी ही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. 

शाळेतील मुलांच्या उपस्थितीच्या नोंदी तीन वेळा म्हणजेच सकाळी, दुपारी आणि शाळा सुटण्याच्यावेळी ठेवायच्या आहेत. अनुपस्थित विद्यार्थ्यांच्या पालकांना एसएमएसद्वारे संदेशही पाठवावे लागणार आहेत. याशिवाय शाळा व्यवस्थापनाने शिक्षक, पालक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांची दक्षता समिती नेमायची आहे. चिराग ऍपचे फलक शाळेच्या दर्शनी भागात लावून, विद्यार्थ्यांना तक्रार नोंदविण्यासाठी मदत शाळांना करावी लागेल. 

बस चालकांनी विद्यार्थ्यांना त्याच्या निवासस्थानाजवळ वा निश्‍चित केलेल्या ठिकाणीच सोडायचे आहे. शाळेतील मुलींना स्पर्धा वा उपक्रमांसाठी बाहेर पाठवायचे असेल, तर त्यांच्यासोबत शक्‍यतो शिक्षिका वा सेविका पाठवावी. विद्यार्थ्यांच्या बसमध्ये अनोळखी प्रवासी बसविता येणार नाहीत. विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि शिक्षक-कर्मचाऱ्यांची प्रसाधनगृहे वेगळी असावी, असे सरकारने म्हटले आहे. 
 

मानसिक इजा पोचवू नका! 

शाळेत येणाऱ्या कोणत्याही मुलास शारीरिक वा मानसिक इजा पोचवू नये, तशा प्रकारची शिक्षादेखील करून नये. याबरोबरच विद्यार्थी मानसिक दबावाला बळी पडू नये म्हणून समुपेदशनाची देखील व्यवस्था करावयची आहे. 
 

Web Title: Attendance of Students for three times