आता 'मेट्रो आकाशकंदील' कसबा पेठेतील हलता देखावा ठरतोय आकर्षण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 नोव्हेंबर 2018

पुणे : मेट्रोविषयी पुणेकरांमध्ये कमालीची उत्सुकता असल्याचे गणेशोत्सवातील देखाव्यांत दिसून आलेच होते...पण दिवाळीतही "मेट्रो'चे आकर्षण कमी झाले नाही. कसबा पेठेतील एका नागरिकाने तर चक्क "मेट्रो आकाशकंदील'च उभा केलाय. 

पुणे : मेट्रोविषयी पुणेकरांमध्ये कमालीची उत्सुकता असल्याचे गणेशोत्सवातील देखाव्यांत दिसून आलेच होते...पण दिवाळीतही "मेट्रो'चे आकर्षण कमी झाले नाही. कसबा पेठेतील एका नागरिकाने तर चक्क "मेट्रो आकाशकंदील'च उभा केलाय. 

रजनीकांत वेर्णेकर असे या नागरिकाचे नाव आहे. कसबा पेठ पोलिस चौकीच्या अलीकडे कसबा पेठेत जाणाऱ्या रस्त्याने पुढे गेल्यानंतर एका जुन्या वाड्याच्या गच्चीवर हा "मेट्रोरूपी आकाशकंदील' तुम्हाला दिसेल. विरुद्ध बाजूने धावणाऱ्या दोन मेट्रो आणि त्यांचे लाल, निळा, पांढऱ्या रंगाच्या प्रकाशाने उजळलेले डबे, मेट्रोच्या रुळाखाली असलेली पिलर्सची रचना, ओव्हरहेड वायर , स्थानक अशी सगळी रचना केली गेली आहे. एका स्थानकाला मेट्रो पोचल्यानंतर तिचे एका बाजूचे इंजिनकडील तोंड आत जाते आणि दुसऱ्या बाजूचे तोंड पुढे येऊन पुन्हा ही मेट्रो परतीच्या स्थानकाकडे जाते, असा हा हलता "मेट्रोरूपी आकाशकंदील' लक्षवेधी ठरला आहे. 

वेर्णेकर यांना हा आकाशकंदील करण्यासाठी एक महिन्याहून अधिक काळ लागला. त्याला सुमारे साडेसहा हजार रुपये खर्चही आला. त्यांचे वडील हे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक होते, त्यामुळे त्यांच्याकडून तांत्रिक ज्ञान मिळाले असल्याने त्याचा उपयोग हा आकाशकंदील तयार करण्यासाठी केल्याचे त्यांनी "सकाळ'ला सांगितले. ""शहरात मेट्रो मार्ग उभारण्याचे काम सुरू आहे. मेट्रोविषयी वडीलधारी लोकांपासून लहान मुलांनाही आकर्षण आहे. त्यामुळे या वर्षी हाच आकाशकंदील करण्याचे ठरविले होते.'' 

Web Title: The attraction of Kasba Peths metro aakashkandil