राज्यातील सर्व शाळांच्या सुरक्षेचे ऑडिट होणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जुलै 2019

पावसामुळे भिंत पडून होणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सर्व शाळांच्या सीमाभिंती आणि अन्य सुरक्षिततेबाबत तपासणी करण्यात येणार आहे. शाळांच्या सीमाभिंती पडून दुर्घटना घडू नये, यासाठी शिक्षण आयुक्त कार्यालयाने यासंबंधी राज्य सरकारशी पत्रव्यवहार केला आहे.

पुणे - पावसामुळे भिंत पडून होणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सर्व शाळांच्या सीमाभिंती आणि अन्य सुरक्षिततेबाबत तपासणी करण्यात येणार आहे. शाळांच्या सीमाभिंती पडून दुर्घटना घडू नये, यासाठी शिक्षण आयुक्त कार्यालयाने यासंबंधी राज्य सरकारशी पत्रव्यवहार केला आहे.

राज्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये ५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा दिल्याने धोकादायक बांधकामांपासून जीविताला धोका होण्याची शक्‍यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या प्रशांत कनोजिया यांनी शिक्षण आयुक्तांना पुणे जिल्ह्यातील शाळांतील सुरक्षेचे ऑडिट करण्यासंबंधी निवेदन दिले आहे. यात अतिवृष्टीच्या काळात सुटी देण्याचीही मागणी केली आहे. शिक्षण आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून यासंबंधी निर्णय घेण्याची विनंती केली आहे.

पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरात रहिवासी इमारतींमध्ये कोचिंग क्‍लास, पूर्वप्राथमिक वर्ग भरविण्यात येतात. पावसाबरोबरच आगीसारख्या नैसर्गिक आपत्तीने नुकसान होण्याची शक्‍यता असल्याचे सांगत कनोजिया यांनी सुरक्षा ऑडिटचीही मागणी केली आहे. शिक्षण आयुक्तांनी शिक्षण विभागाच्या सर्व संचालकांना त्यावर कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत.

शाळांच्या सुरक्षेच्या ऑडिटबाबत शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांशी पत्रव्यवहार केला आहे. यात शाळांतील सुरक्षाव्यवस्था तपासण्याबाबत शासन स्तरावरून धोरणात्मक निर्णय करण्याबाबत सूचित केले आहे. राज्य सरकारी स्तरावरूनही शाळांच्या सुरक्षेचे ऑडिट करण्याचे आदेश जारी होणार असल्याचे आयुक्तालयातील सूत्रांनी सांगितले.

शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्यादृष्टीने आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवण्यापूर्वीच सर्व शाळांचे स्ट्रक्‍चरल आणि सुरक्षेचे ऑडिट झालेच पाहिजे. यामुळे इमारती, सीमाभिंतीची स्थिती समजेल आणि खबरदारीसाठी उपाययोजना करता येतील.
- हरिश्‍चंद्र गायकवाड, अध्यक्ष, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: audit of all schools will be audited in the state