नदी पात्रातील शेतीमुळे रोजगाराचा ‘आनंद’

बाबा तारे
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

आमचा पारंपरिक मासेमारीचा व्यवसाय बंद पडल्याने मी आता पूर्ण वेळ शेती हा व्यवसाय म्हणून निवडला. यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल, एवढे उत्पन्न यातून मला मिळत आहे. या शेतीसाठी सरकारी नियमाप्रमाणे मी वार्षिक भाडेही भरत आहे. अशा प्रकारे शेती करणाऱ्यासाठी तरुणांना प्रोत्साहन व सरकारी मदत मिळाली, तर मासेमारीतून बाहेर पडलेली कुटुंबे यातून उभी राहू शकतील.
- आनंद काची, शेतकरी

औंध - बोपोडी येथील आनंद काची या तरुणाने बोपोडी येथील मुळा नदीच्या पात्रातील रिकाम्या पट्ट्यात भाजीपाल्याची शेती फुलवून रोजगार तर मिळवलाच; परंतु ग्रामीण शेतीला शहरी रूप देत भाजीपाला उत्पादन घेऊन वेगळा मार्ग चोखाळला आहे. 

मुळशी ते शिवाजीनगर परिसरातील संगमवाडीपर्यंत असलेल्या मुळा नदी पात्रात काही ठिकाणी शेतीयोग्य जमीन असून, यात भाजीची शेती केली तर यातून रोजगार मिळून नदी प्रदूषित होण्यापासून वाचवण्याचाही प्रयत्न साध्य होऊ शकेल. आनंद यांचा जन्म मासेमारी करणाऱ्या कुटुंबातील. नदीतील मासेमारीवर जगणारे त्यांचे कुटुंब मासेमारी करतानाच पात्रात शेतीही करत असे. आनंद यांच्या आजोबांपासून ही शेती केली जात होती; परंतु अलीकडच्या काळात मासेमारीवर मर्यादा येऊन हा व्यवसाय बंद पडला. यामुळे आनंदला वेगळा व्यवसाय शोधावा लागला. पूर्वी केली जाणारी शेती घरातील गरज भागवण्यासाठी केली जायची; परंतु आता हीच शेती काची कुटुंबीयांच्या रोजगाराचे साधन बनले आहे. या शेतीत ते कारली, वांगी, दोडका, मेथी, मिरची, घेवडा, भोपळा आदींची लागवड करून चांगले उत्पन्नही घेत आहेत. गेल्या वर्षी या शेतीने खूप मोठा आधार दिल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकलो, असे आनंद सांगतात. या शेतीसाठी वार्षिक भाडेही सरकारला दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. या कामात पत्नी, भाऊ मदत करतात. नदी पात्रातील पाणी न वापरता नदीच्या पूर्वेला वाहत असलेल्या जिवंत झऱ्यातील पाणी वापरून ही शेती केली जाते. यामुळे शुद्ध व चवदार भाजीपाला मिळतो. हा भाजीपाला जवळपासच्या परिसरात विक्री केला जातो.

Web Title: aundh news pune news river agriculture employment