व्यवस्थापनशास्त्र संस्थांना स्वायत्तता

AICTE
AICTE

पुणे - कोणत्याही विद्यापीठाशी संलग्न नसणाऱ्या; परंतु व्यवस्थापनशास्त्रातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम (पीजीडीएम) चालविणाऱ्या उत्कृष्ट संस्थांना श्रेणी स्वायत्तता (ग्रेडेड ऑटोनॉमी) दिली जाणार आहे. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) हे महत्त्वाचे पाऊल उचलत यासंबंधी अधिसूचना जारी केली आहे. यामुळे व्यवस्थापनशास्त्र संस्थांची गुणवत्तादेखील निश्‍चित होणार आहे.

देशभरातील सुमारे साडेतीनशेहून अधिक, तर राज्यातील चाळीसहून अधिक संस्थांना याचा लाभ घेता येणार आहे. या स्वायत्ततेमुळे आधुनिक काळाशी सुसंगत असे अभ्यासक्रम तयार करण्याबरोबरच ते विद्यार्थ्यांना शिकविता येणार आहेत. त्यासाठी ‘एआयसीटीई’ची कोणतीही परवानगी घेण्याची गरज लागणार नाही. व्यवस्थापनशास्त्र संस्थांकडूनही या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. या निर्णयामुळे चांगल्या संस्थांना प्रोत्साहन मिळण्याबरोबरच शैक्षणिक दर्जाच्या विचार न करता अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्थांना आळा बसेल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

‘एआयसीटीई’चे सदस्य सचिव राजीव कुमार ‘सकाळ’शी बोलताना म्हणाले, ‘‘विद्यापीठ अनुदान आयोगाकडून ज्या प्रकारे चांगल्या शैक्षणिक संस्थांना स्वायत्तता मिळते, त्याच धर्तीवर श्रेणीनुसार स्वायत्तता देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. गुणवत्तेचे निकष पूर्ण करणाऱ्या संस्थांना याचा लाभ मिळेल. त्यांना परिषदेकडून अधिसूचित केले जाईल. त्यासाठी इच्छुक संस्थांकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत. त्यांच्या दर्जानुसार तीन श्रेणींमध्ये त्यांना स्वायत्तता दिली जाईल. ज्या संस्थांकडे पायाभूत सुविधा चांगल्या असण्याबरोबर शैक्षणिक गुणवत्ता देखील आहे, अशा संस्थांना ही श्रेणी स्वायत्तता मिळेल.’

ही श्रेणी स्वायत्तता मिळणाऱ्या संस्थांना कालसुसंगत अभ्यासक्रम तयार करता येतील. दूरशिक्षण पद्धतीनेही अभ्यासक्रम चालविता येतील. तसेच अन्य ठिकाणी नवी शैक्षणिक संकुलेही त्यांना सुरू करता येतील. त्यासाठी परिषदेच्या परवानगीची गरज लागणार नाही, 
- राजीव कुमार, सदस्य सचिव, एआयसीटीई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com