Avengers Endgame : "द एण्डगेम'चे तब्बल 24 तास खेळ ! 

Avengers Endgame : "द एण्डगेम'चे तब्बल 24 तास खेळ ! 

पुणे - उन्हाळ्याच्या सुट्या सुरू होताच दरवर्षी चर्चा असते, या काळात कोणता ब्लॉकबस्टर हिंदी चित्रपट प्रसिद्ध होणार, कोणता अभिनेता या काळात सर्व चित्रपटगृहांवर राज्य करणार, किती मराठी चित्रपट एकाच आठवड्यात चित्रपट बारीवर गर्दी करणार... यंदा मात्र चर्चा आहे "ऍव्हेंजर्स ः द एण्डगेम' या आज (शुक्रवारी) प्रदर्शित होणाऱ्या हॉलिवूडपटाचीच! या चित्रपटाचे पुण्यातील सर्व मल्टिप्लेक्‍समधील सर्व शो हाउसफुल्ल झाले असून, दिवसातले 24 तास हा सिनेमा दाखविण्याचा निर्णय अनेक चित्रपटगृहांनी घेतल्याने एक नवा इतिहासच नोंदविला गेला आहे. 

सुटीच्या काळात होणारी चित्रपटांची गर्दी आणि प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद हे चित्र दरवर्षी दिसते. मात्र या वर्षी "एण्डगेम'चीच चर्चा नेट आणि सोशल मीडियावर महिन्यापासून सुरू झाली आणि तरुणांच्या गर्दीने या चित्रपटावर पसंतीची मोहोर उमटविली. "ऍव्हेंजर्स'ची मालिका 2012 मध्ये सुरू झाली आणि गेल्या सात वर्षांतील "एण्डगेम' हा चौथा भाग आहे. पहिला भाग प्रदर्शित झाल्यापासून या मालिकेबद्दलची उत्सुकता वाढवत नेण्यात निर्माता-दिग्दर्शकाला यश आले असून, या भागाला मिळणाऱ्या प्रतिसादाने कळसाध्याय गाठला आहे. दक्षिणेतील सिनेमांप्रमाणे बुकिंगसाठी मोठ्या रांगा, पहाटे पावणेदोनपासून सुरू होणारे शोज, बुक माय शोसारख्या माध्यमातून होणारे तुफान बुकिंग असे चित्र पाहायला मिळत आहे. या मालिकेत ऍक्‍शन आणि ग्राफिक्‍सचा सढळ वापर केला असल्याने प्रेक्षकांची पसंती हा चित्रपट "थ्री डी'मध्ये पाहण्यास अधिक आहे. 

या चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे. आम्ही प्रथमच पहाटे 5.30 पासून शोज दाखविणार असून, चोवीस तास थिएटर सुरू ठेवण्याची प्रेक्षकांची मागणी आहे. असा "फेनॉमिनल हाइप' मी आजपर्यंत पाहिलेला नाही. सर्व गर्दी टीन एजर्स व तरुणांची आहे. हिंदी व मराठीत बड्या बॅनरला चित्रपट नसल्याने ही गर्दी सर्वच चित्रपटगृहांसाठी आर्थिकदृष्ट्या फायद्याची ठरेल. 
- अरविंद चाफळकर, कोथरूड सिटीप्राइड 

का आहे उत्सुकता? 
मार्व्हल कॉमिक्‍सच्या "ऍव्हेजर्स' या सुपरहिरो टीमवर आधारित मालिकेतील हा चौथा चित्रपट आहे. या मालिकेचे दिग्दर्शक अँथोनी व जो रुसो असून, ख्रिस्तोफर मार्कस व स्टीन मैक्‍फिली यांनी पटकथा लिहिली आहे. स्पायडरमॅन, आयर्न मॅन, कॅप्टन अमेरिका, हल्क यांच्यासारखे तरुणांचे लाडके हिरो आणि थॅनस हा खलनायक यांच्यामधील सहा इन्फिनिटी स्टोन्स ताब्यात घेण्याच्या लढाईतील हा सर्वांत उत्कंठावर्धक (कदाचित शेवटचाही!) भाग असून, त्याने प्रेक्षकांना वेड लावले आहे. 

या आधी युद्धात मारली गेलेली पात्रे पुन्हा जिवंत होणार का? येथपासून या भागाचा शेवट नक्की काय होणार? याबाबत प्रेक्षकांत मोठी उत्सुकता आहे. कॉम्प्युटर ग्राफिक्‍स आणि प्रीव्हिज्युअलायझेशन अशा अतिप्रगत तंत्रांमुळे अनेक गोष्टी पडद्यावर अक्षरशः जिवंत करण्याची किमयाही चित्रपटाने साधली आहे. जगभरात टू-डी, थ्री-डीबरोबरच एमएक्‍स फोर-डी, थ्री-डी फोरडीएक्‍स, आयमॅक्‍स थ्री-डी अशा वेगवेगळ्या माध्यमांमधूनही त्याची लज्जत चाखायची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com