पीएमपीच्या सव्वाशे बस रोज बंद पडतात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

पुणे : देखभाल दुरुस्तीकडे प्राधान्याने लक्ष दिले जात आहे, असा दावा पीएमपी प्रशासनाकडून केला जात असला, तरी गेल्या आठ दिवसांपासून दररोज सुमारे 125 हून अधिक बस बंद पडत आहेत. त्यात कंत्राटदारांच्या बसचे प्रमाण जास्त आहे. मात्र, त्यांच्याकडून पुरेशा उपाययोजना होत नसल्यामुळे प्रवाशांचे हाल वाढले आहेत. 

पुणे : देखभाल दुरुस्तीकडे प्राधान्याने लक्ष दिले जात आहे, असा दावा पीएमपी प्रशासनाकडून केला जात असला, तरी गेल्या आठ दिवसांपासून दररोज सुमारे 125 हून अधिक बस बंद पडत आहेत. त्यात कंत्राटदारांच्या बसचे प्रमाण जास्त आहे. मात्र, त्यांच्याकडून पुरेशा उपाययोजना होत नसल्यामुळे प्रवाशांचे हाल वाढले आहेत. 

मंगळवारी एका दिवसात पीएमपीच्या सुमारे 140 बस शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये बंद पडल्या. यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. त्यात पीएमपीच्या 50, तर खासगी ठेकेदारांच्या 90 बसचा समावेश होता. परिणामी, अनेक मार्गांवरील बसचे वेळापत्रक कोलमडले होते. स्वारगेट, मंडई, महापालिका भवन, पुणे स्टेशन, सिंहगड रस्ता, वडगाव शेरी, निगडी, अप्पर इंदिरानगर, कात्रज-धनकवडी आदी भागांतील प्रवाशांची त्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. 

याबाबत पीएमपी प्रशासनाकडे विचारणा केली असता, "बस देखभालीची समस्या, रस्त्यावरील खड्डे, जुन्या बस यामुळे प्रमाण वाढले आहे, असे समजते. त्याचबरोबर पीएमपीच्या ताफ्यातील सुमारे 400 बसचे आयुर्मान हे संपले आहे. तरी या बस रस्त्यावर सोडल्या जात आहेत. त्यामुळे वायू प्रदूषणाबरोबर ध्वनिप्रदूषणही होत आहे. बंद पडणाऱ्या गाड्यांमध्ये या बसचे प्रमाण जास्त आहे. पीएमपी, दर दहा दिवसांनी बसची तपासणी करत असते. मात्र, प्रवाशांची गरज लक्षात घेत खराब असूनही चालू शकेल, अशा बस देखील रस्त्यावर उतराव्या लागतात.' 

बंद पडणाऱ्या बसमध्ये ठेकेदारांच्या बसचे प्रमाण अधिक आहे. मात्र, त्यांना दंड केला जात नाही. दोषीवर कडक कारवाई केली पाहिजे. तसेच दुरुस्ती आणि देखभाल दिला जाणारा निधी पूर्ण वापरला जात नाही. 
- जुगल राठी, अध्यक्ष, पीएमपी प्रवासी मंच 

पीएमपीकडे असणाऱ्या बसमध्ये जुन्या बसचे प्रमाण मोठे आहे. पण, प्रवाशांच्या गरजेसाठी त्या बसही रस्त्यावर उतराव्या लागतात. कंत्राटदारांच्या भाडेतत्त्वावरील बंद पडणाऱ्या बसचे प्रमाण जास्त आहे. त्यासाठी त्यांना सातत्याने आदेश दिले जात आहेत. 
- सुभाष गायकवाड, जनसंपर्क अधिकारी, पीएमपी 

- शहरात पीएमपीचे 13 वर्कशॉप 
- मेकॅनिकची संख्या 1309 
- पीएमपीच्या गाड्यांची संख्या 1442 
- पीएमपीच्या 400 बसचे आयुर्मान 12 वर्षापेक्षा अधिक 
- या महिन्यात आतापर्यंत बंद पडलेल्या बसची संख्या 1500 पेक्षा अधिक 

Web Title: average 125 pmpl buses breakdown every day