इंदापुरातील शेतकरी कुटुंबातील अविनाश झाला जिल्हाधिकारी

डॉ. संदेश शहा
Sunday, 6 September 2020

युपीएससीमध्ये य़श मिऴविल्याबद्दल अविनाश संजीवन शिंदे (पवारवाडी ता. इंदापूर) यांचा माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते इंदापूर येथे सत्कार करण्यात आला.

इंदापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (युपीएससी) सन 2019 मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेतून जिल्हाधिकारीपदी निवड झाल्याबद्दल अविनाश संजीवन शिंदे (पवारवाडी ता. इंदापूर) यांचा माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते इंदापूर येथे सत्कार करण्यात आला.

यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले, ''शेतकरी कुटुंबातील अविनाश शिंदे या युवकाने जिद्द व चिकाटीच्या जोरावर मेकॅनिकल इंजिनिअर झाल्यानंतर देशसेवा करण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सर्वोच्च परीक्षेमध्ये यश मिळवून तो जिल्हाधिकारी झाला आहे. त्याने तालुक्याचा नावलौकिक उंचावला असल्याने त्याचा जनतेला सार्थ अभिमान आहे. स्पर्धा परिक्षा देणाऱ्या युवकांसाठी अविनाश यांनी आदर्श घालून दिला आहे.''

यावेळी संजीवन शिंदे, राजेंद्र शिंदे, शीतल शिंदे, शांताराम वाकळे, बाळासाहेब मोरे, शिवाजी मोरे, गणेश घोरपडे, सुनील कणसे आदी उपस्थित होते.

युपीएससी स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या देशातील जिल्हाधिकार्‍यांना मसूरी-डेहराडून (उत्तराखंड) येथे प्रशिक्षण दिले जाते. राज्याचा संसदीय कार्यमंत्री असताना उत्कृष्ट संसदीय कार्यमंत्री म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते आपला गौरव करण्यात आला होता. त्यावर्षी मसुरी येथे प्रशिक्षणार्थी जिल्हाधिका- र्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या आपल्या व्याख्यानास उस्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची आठवण यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Avinash Shinde elected as District Collector