आला पावसाळा; विजेचे धोके टाळा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

पिंपरी : "पावसाळ्यात विद्युत उपकरणे आणि तारांमुळे विद्युत अपघाताच्या दुर्दैवी घटना घडतात. त्या पार्श्‍वभूमीवर विजेचे धोके व दुर्घटना टाळण्यासाठी महावितरणने काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. विद्युत ग्राहकांनी या सूचनांचे पालन करून सावध व सुरक्षित राहावे,'' असे आवाहन करण्यात आले आहे.
 

पिंपरी : "पावसाळ्यात विद्युत उपकरणे आणि तारांमुळे विद्युत अपघाताच्या दुर्दैवी घटना घडतात. त्या पार्श्‍वभूमीवर विजेचे धोके व दुर्घटना टाळण्यासाठी महावितरणने काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. विद्युत ग्राहकांनी या सूचनांचे पालन करून सावध व सुरक्षित राहावे,'' असे आवाहन करण्यात आले आहे.
 
विजांचा कडकडाट होत असल्यास घरातील सर्व विद्युत उपकरणे बंद करून ते वीजजोडपासून बाजूला करावेत. घरातील अर्थिंग सुस्थितीत असावी. शिवाय गरजेनुसार त्याची तपासणी करावी. घराच्या किंवा इमारतीच्या मुख्य स्विचमध्ये व त्याच्या शेजारील किटकॅटमध्ये फ्यूज तार म्हणून तांब्याची तार वापरू नये. त्याऐवजी ऍल्युमिनियम अलॉय ही विशिष्ट धातूची तार वापरली पाहिजे. वीज ही अत्यावश्‍यक गरज आहे. मात्र, त्या विजेचा वापर सुरक्षिततेची खबरदारी घेऊन योग्यप्रकारे केला, तरच ती उपयोगी ठरू शकते. अन्यथा, दुर्घटना घडून वीज अतिधोकादायक होऊ शकते. त्यामुळे वीजग्राहकांनी पावसाळ्यात विद्युत उपकरणे हाताळताना अधिक खबरदारी घेणे आवश्‍यक आहे, असे महावितरणने म्हटले आहे. 

अशी घ्या काळजी 
विद्युत खांबांना व तणाव तारेला (स्टेवायर) जनावरे बांधू नयेत. 
विद्युत खांबांना दुचाकी टेकवून ठेवू नयेत. 
घरातील दूरचित्रवाणीची डिश किंवा ऍन्टेना वीजतारांपासून दूर ठेवावे. 
ओल्या कपड्यांवर इस्त्री फिरवू नये. 
विद्युत खांबांना तार बांधून कपडे वाळत घालू नयेत. 
स्वीचबोर्डला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. 
विजेवर चालणारे सर्व उपकरणे स्वीचबोर्डापासून दूर करावे. 
पत्र्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहावे. 
विद्युत उपकरणांची दुरुस्ती करताना मेन स्वीच बंद करावा. 
दुरुस्तीदरम्यान पायात रबरी चपला घालाव्यात 
पायाखालची जमीन ओलसर असू नये. 
वायरची जोडणी करताना एकच वायर तुकड्या-तुकड्यात जोडू नये. 
जोडणी करताना त्यावर इन्शुलेशन टेप लावावी. 

येथे करा तक्रार 
वीजपुरवठा खंडित झाल्यास 15 ते 20 मिनिटे थांबूनच महावितरणला संपर्क करावा. तार तुटल्यास वा पोल पडल्यास, तसेच बिघाड नेमका कोठे झाला, याची माहिती असल्यास वीज कंपनीला संपर्क करावा. ग्राहकांनी 1800-102-3435, 1800-233-3435, 92255-92255 या बारा अंकी टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी. 

 

Web Title: avoid the dangers of electricity rainy season