मधुमेह टाळण्यासाठी यंदा ‘कुटुंबा’वर भर 

मधुमेह टाळण्यासाठी यंदा ‘कुटुंबा’वर भर 

पुणे - जीवनशैलीत होत असलेले बदल आणि व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेहींची संख्या वाढत आहे. त्याबाबत जागरूकतेसाठी आता कुटुंब या घटकावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. इंटरनॅशनल डायबेटीस फेडरेशनने ही घोषणा केली असून, त्यानुसार आता पुण्यासह जगभर उपक्रम राबविले जाणार आहेत. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीनुसार, मधुमेहींची संख्या सध्या चीनमध्ये सर्वाधिक (११ कोटी ४४ लाख) असून, त्या खालोखाल भारतात (७ कोटी ९० लाख) आणि त्यानंतर अमेरिकेत (तीन कोटी २० लाख) आहे. मधुमेहींच्या वाढीचा वेग जगभरातच जास्त असून, तो असाच राहिला तर, २०४५ पर्यंत भारत पहिल्या क्रमांकावर येऊ शकतो. भारतात मधुमेहींच्या संख्येचा वाढीचा वेग ८४ टक्के, तर अमेरिकेतील ७५ टक्के असून, युरोप-ऑस्ट्रेलियात १६ टक्के आहे. मधुमेहावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या पाच देशांतही भारताचा क्रमांक वरचा आहे. 

देशातही लहान मुले, युवक आणि गर्भवती महिलांमध्ये मधुमेह वेगाने विस्तारत आहे. मधुमेह रोखण्यासाठी जागरूकता निर्माण करण्याचे प्रयत्न होत असले तरी त्यात आणखी वाढ व्हावी, यासाठी फेडरेशनने कुटुंबावर लक्ष केंद्रित केले आहे. एखाद्या कुटुंबात मधुमेही असेल तर, त्याचा आहार, व्यायाम आणि औषधे याबाबत कुटुंबाने जबाबदारी घ्यायला पाहिजे. त्यातून प्रतिबंधात्मक उपाययोजना त्यांनाही माहिती होतील आणि मधुमेहाला रोखतानाच त्याबाबत जागरूकताही निर्माण होईल, असा ‘फेडरेशन’चा अंदाज आहे. अनेकदा ज्येष्ठ नागरिकांना औषधे घेण्याचे, व्यायामाचे विस्मरण होते. त्यासाठी कुटुंब हा घटक प्रभावी आहे, असेही त्यांचे म्हणणे आहे. बैठे काम, व्यायामाचा अभाव, चुकीच्या आहार पद्धती इत्यादी कारणांमुळे मधुमेहींची संख्या वाढत आहे. मधुमेहावर उपचार करण्यापेक्षा तो होऊच नये, यासाठी समाजात जागरूकता करण्याची गरज आहे.

यामुळे दूर राहील मधुमेह
दररोज सुमारे ४५ मिनिटे किमान चालण्याचा व्यायाम हवा 
आहारात गोड पदार्थ टाळावेत
तेलकट पदार्थ दूर ठेवून मोड आलेली कडधान्ये घ्या 
धूम्रपान, मद्यपान इत्यादी सवयी बंद कराव्यात 
तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे परस्पर घेऊ नका 

मधुमेहाचा प्रसार रोखणे शक्‍य आहे. त्यासाठी जागरूकता आवश्‍यक आहे, अन्‌ त्याच उद्देशाने कुटुंब या घटकावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. रोज किमान ४५ मिनिटे चालण्याचा व्यायाम केला आणि आहारात थोडासा बदल केला तरी, मधुमेहापासून दूर राहू शकतो. त्यासाठी प्रत्येकाने लक्ष द्यायला हवे.
-डॉ. शैलजा काळे, मधुमेहतज्ज्ञ

मधुमेह म्हटले की, सगळा भर रक्तातील साखरेवर असतो. त्याबरोबरच हृदयविकार टाळण्याकडेही लक्ष द्यायला हवे. त्यासाठी दररोज व्यायाम हवा. धूम्रपान बंद करून मैदानी व्यायाम केला पाहिजे. केवळ योगासने म्हणजे व्यायाम नाही तर, शरीरात रक्ताभिसरण वेगाने होईल, असे व्यायाम प्रकार केले पाहिजेत आणि आहारातही आवश्‍यक ते बदल हवेत. 
-डॉ. श्रीरंग गोडबोले, मधुमेहतज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com