पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून प्रवास करताय? 'ही' 20 ठिकाणं टाळा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

 पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ११ किलोमीटरच्या अंतरात २० ठिकाणी दरड कोसळण्याची शक्‍यता असल्याचा अहवाल राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) तब्बल चार वर्षांपूर्वी देऊनही पुरेशा उपाययोजना झाल्या नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ११ किलोमीटरच्या अंतरात २० ठिकाणी दरड कोसळण्याची शक्‍यता असल्याचा अहवाल राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) तब्बल चार वर्षांपूर्वी देऊनही पुरेशा उपाययोजना झाल्या नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या अहवालात नमूद केलेल्या ठिकाणीच बुधवारी मोठी दरड कोसळून दोघे जखमी झाले. 

द्रुतगती मार्गावर दरड कोसळण्याची शक्‍यता असलेल्या ठिकाणांची शास्त्रीय माहिती संकलित करण्यासाठी राज्य सरकारने २६ ऑगस्ट २०१५ रोजी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश सुमन पंडित आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी सचिव मधुकर पाटील यांची समिती नियुक्त केली होती. त्यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील (सीओईपी) भूगर्भशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बी. एम. करमरकर यांची मदत घेतली. त्यांनी आणि जयंत देशपांडे यांनी खोपाली (३६. ५०० किलोमीटर) ते खंडाळा (४७. १०० किलोमीटर) दरम्यान ११ किलोमीटर क्षेत्रातील दरडींची पाहणी केली. त्यात २० ठिकाणी दरड कोसळण्याची शक्‍यता असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तेथे कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबतच्या अहवालाचे डॉ. करमरकर यांनी तज्ज्ञांच्या समितीपुढे, तसेच ‘एमएसआरडीसी’, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अधिकाऱ्यांपुढे सादरीकरण केले. हा अहवाल त्यांनी १ नोव्हेंबर २०१५ रोजी राज्य सरकारकडे पाठविला होता.  

धोकादायक ठिकाणी राज्य रस्ते महामंडळाने फक्त जाळी लावली आहे. भूगर्भातील धोकादायक ठिकाणी रॉकबोल्ट लावणे गरजेचे होते; परंतु त्याबाबत कार्यवाही झालेली दिसत नाही. 

दरड कोसळण्याच्या धोकादायक ठिकाणी उपाययोजना करताना संबंधित अधिकारी, ठेकेदार यांनी तज्ज्ञांशी चर्चा करणे गरजेचे होते. त्यातून त्यांना नेमक्‍या उपाययोजना स्पष्ट करता आल्या असत्या. या पुढील काळात अशा प्रकारची चूक दुरुस्त करता येऊ शकेल. 
- डॉ. बी. एम. करमरकर, माजी विभाग प्रमुख, भूगर्भशास्त्र, सीओईपी

*************************************

मंकीहिलजवळ पुन्हा दरड कोसळली
बो  रघाटात ठाकूरवाडी- मंकीहिलदरम्यान बुधवारी (ता. १०) मध्यरात्री रेल्वेमार्गावर पुन्हा दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती. दरड कोसळल्याने रेल्वेच्या डाऊन आणि मिडल लाइनला हानी पोचल्याने मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या पंधरा गाड्यांचे वेळापत्रक विस्कळित झाले होते. लोणावळा परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे रात्री अकराच्या सुमारास रेल्वे किलोमीटर क्रमांक ११६/४५ जवळील बोगद्याच्या तोंडावर रेल्वेच्या मिडल लाइनवर सुट्या झालेल्या दरडी कोसळल्या. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. रेल्वेच्या वतीने या ठिकाणी तातडीने दुरुस्तीचे काम हात घेण्यात आले. दरडी बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. 

दरम्यान, ठाकूरवाडी-मंकी हिलदरम्यान आठ जुलै रोजी दुपारी तीनच्या सुमारास दरडीचा मोठा भाग लोहमार्गावर पडला. सुमारे दोन मीटरपेक्षा मोठ्या दगड-धोंड्यांचा त्यात सावेश होता. रेल्वे कर्मचाऱ्यांनी सलग चौदा तास पावसातही लोहमार्गावरील दगड-धोंडे दूर करून वाहतूक सुरळीत केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Avoid these 20 places Traveling through Pune-Mumbai Expressway