पुरस्कार ही कलावंतांची भूक - राजदत्त 

पुरस्कार ही कलावंतांची भूक - राजदत्त 

पुणे - ""सौभाग्यवतीला मंगळसूत्र दाखविताना जो आनंद आणि अभिमान वाटतो. अगदी तसंच कलाकारालाही पुरस्काराबद्दल वाटते. सत्कार कलाकाराच्या जगण्याची गरज आहे. कारण पुरस्कार हे कलावंताला ऊर्जा देणारे असतात. म्हणूनच पुरस्कार आम्हा कलावंतांची भूक आहे. कलेतून प्रेक्षकांना आनंद आणि दिशा देण्याचे समाधान आम्हाला मिळते,''असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी व्यक्त केले. 

संवाद पुणे, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणी सभा आयोजित कार्यक्रमात राजदत्त यांना किरण शांताराम यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. रंगभूमीवर पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिनेते विक्रम गोखले यांना अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अभिनेते मनोज जोशी, डॉ. पी. डी. पाटील, मेघराज राजेभोसले, वामन केंद्रे, विजय कुवळेकर, रघुनाथ येमूल, सुनील महाजन, राजेश पांडे, सुप्रिया बडवे, राहुल रानडे यांच्यासह चित्रपट-नाट्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

राजदत्त म्हणाले, ""रसिक प्रेक्षकांनो, तुमचे कलाक्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीवर प्रेम राहो. मग ती कला कोणतीही असो. तुम्ही प्रेम करत राहावे. त्यातूनच आम्हालाही प्रोत्साहन मिळते. कारण कलेचा उद्देशच माणसाला आनंद देण्याचा आहे. एखाद्याला चांगली वाट दाखविण्याचे कार्यही कलेतून होते. केवळ टाळ वाजवत देवाचे नाव घेण्यापेक्षा संत एकनाथांनी भारुडं रचली. भारुडातून सामान्यांना आनंद दिला.'' 

नाना हा अत्यंत प्रेमळ व मृदू मनाचा आहे. तो विचारी आहे. माणूस म्हणून तो मला आवडतो. कलाकाराचे कौतुक करण्याची वृत्ती त्याच्याकडे आहे. मी सैनिकांना, तर तो शेतकऱ्यांना मदत करतो आहे. 
विक्रम गोखले, अभिनेते 

विक्रम तू कायम मोठा आहेस. तू थोरला होतास आणि आहेस. तू नटसम्राट केला असतास, तर आमच्यापेक्षा कितीतरी पटीने नटसम्राटमधील भूमिका तू उत्तम साकारली असतीस. तू बॅरिस्टर केलंस. ते नाटक तू बसव. कारण मला बॅरिस्टर करायचे आहे. तू बसविलेल्या बॅरिस्टरमध्ये मी नक्की भूमिका करेन. 
नाना पाटेकर, अभिनेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com