
राम मंदीर उभे रहावे यासाठी पुणे व परिसरातून हजारो कारसेवक त्यावेळी अयोध्येला रवाना झाले होते. आजच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर अनेक कारसेवकांनी सकाळशी आपल्या भावना बोलून दाखविल्या.
पुणे : ''कारसेवेसाठी आयोध्येला जाताना घरच्यांना आमच्या काळजीने ग्रासले होते. ठिकठिकाणी पोलिस अडवून लाठीमार करत होते. अटक करत होते. या प्रचंड वेदना सहन करत अयोध्येला जाण्याचे ध्येय सोडले नाही. मात्र, तेव्हा सहन केलेल्या त्रासावर आजच्या न्यायालयाच्या निकालाने सुखद फुंकर घातली आहे. आता लवकरात लवकर राम मंदीर उभे रहावे हीच अपेक्षा,'' अशा भावना पुण्यात कारसेवकांनी व्यक्त केल्या.
राम मंदीर उभे रहावे यासाठी पुणे व परिसरातून हजारो कारसेवक त्यावेळी अयोध्येला रवाना झाले होते. आजच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर अनेक कारसेवकांनी सकाळशी आपल्या भावना बोलून दाखविल्या.
श्रीनिवास कुलकर्णी म्हणाले, ''बजरंग दलाची पुणे महानगराची जबाबदारी असताना माझ्यासह अनेक जण 1990 ला पुण्यातून अनेक कारसेवक अयोध्याच्या दिशेने निघालो. आम्हाला मिर्झापूर येथे पोलिसांनी पकडले. 10 दिवसांनी सोडून दिल्यानंतर वेगळ्या मार्गाने अयोध्येत जाण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी पोलिसांनी आम्हाला अडविले आणि लाठीमार केला. अनेकजण यात जखमी झाले. तरीही अयोध्येत जाण्याचा ध्यास सोडला नाही. यात महिला, पुरुष सर्वांनीच वेदना सहन केल्या होत्या. आज लागलेल्या निकालामुळे आम्ही सुखावलो आहोत. भगवान श्रीरामासाठी जातीपाती विसरून हिंदू समाज एकवटला होता हे या कारसेवेचे वैशिष्ट्य होते. आता लवकरात लवकर राम मंदीर उभे रहावे ही अपेक्षा आहे.’
‘राम जन्मभूमीसाठी चालविलेले आंदोलन हे हिंदू-मुस्लिम असे नव्हते तर, ते परकीय अतिक्रमणाचा कलंक पुसण्याचा त्याचा उद्देश होता. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे आयुष्यातील आनंदाचा दिवस आहे. कारसेवेला जाताना आमच्या सुरक्षेची काळजी घरच्यांना होतीच, पण कोणी विरोध केला नव्हता. रामजन्म भूमीचे आंदोलन उर्त्स्फूत होत,’ शरद गंजीवाले यांनी सांगितले.
अंबेजोगाई येथून पुण्यात धायरी येथे स्थानिक झालेले मोहन कुलकर्णी म्हणाले, ‘मी इलेक्ट्रिशनचे काम करण्यासाठी बाहेर जात असे. जेव्हा कारसेवा सुरू झाली तेव्हा घरच्यांना न सांगता अयोध्येला निघालो. त्यांना खूप उशिरा मी अयोध्येला गेल्याचे कळाले. पण, प्रभू श्रीरामाचे मंदीर उभे राहिले पाहिजे, आपल्या श्रद्धेचा विषय होता. पोलिसांनी ठिकठिकाणी अडविले, रेल्वे पुढे जात नव्हत्या. तेव्हा जंगलातून रस्ता शोधत अयोध्येकडे कूच केली होती. आज मंदिर उभारणीतील मोठा अडसर दूर झाला.’
अन अयोध्या गाठली
राजेंद्र वर्धावे म्हणाले, ‘कर्जत येथील काही स्वयंसेवक अयोघ्येला निघाले होते. त्यांना सोडण्यासाठी म्हणून मी रेल्वेने कल्याणपर्यंत गेलो, पण तेथून मागे वळण्याची माझी इच्छा होत नसल्याने मी अयोध्येला निघालो. आम्हाला ललीतपूर येथे पोलिसांनी अटक केली होती. आजच्या निकालाकडे आमचे लक्ष होते. देश शांत व सुखी होण्यासाठी महत्वाचा निर्णय आहे.’
दत्तात्रय ताम्हणकर यां कारसेवकाने आज निकालाप्रकरणी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, ''कारसेवेत सहभागी झालो त्यावेळी गोळीबारही झालेला पोलिसांकडून अटकही करण्यात आली होती, राममंदिरासाठी आम्ही जेलमध्येही होतो मात्र, आता जिवंतपणी राममंदिर बघू शकू. निकालाला उशीर झाला असला तरी, योग्य निकाल लागल्याचे समाधान वाटत आहे.