ऊर्मी असेल तर कोठेही काम करता येते

नीला शर्मा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

ज्येष्ठ रंगकर्मी बी. जयश्री यांना कन्नड भाषेतील नाटक, चित्रपट व मालिकांमधील अभिनय, गायन, दिग्दर्शन, तसेच इतर अभिनेत्रींना आवाज देणं (डबिंग) अशा वैविध्यपूर्ण भरीव कामगिरीसाठी ओळखलं जातं. त्यांना पुण्यातील ‘रूपवेध प्रतिष्ठान’तर्फे ‘तन्वीर’ सन्मानानं रविवारी (ता. ९ डिसेंबर) सायंकाळी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. या निमित्ताने बी. जयश्री यांच्याशी नीला शर्मा यांनी केलेली बातचीत....

प्रश्न : राज्यसभेत नियुक्त सदस्य म्हणून काम करताना कलावंत म्हणून आपला अनुभव कसा होता?
बी. जयश्री : काम करण्याची ऊर्मी असेल तर कुठेही काम करता येतं. मात्र, कलावंत या नात्यानं मला सरकारकडून कला व संस्कृतीशी निगडित कार्यक्षेत्रांत काम करायला मिळालं असतं, तर आणखी चांगली कामगिरी करता आली असती. मला शेतीशी संबंधित क्षेत्र मिळालं, तेव्हा मी सेंद्रिय शेतीबद्दल जनजागृती करण्यासाठी धडपडले. आरोग्य खात्याच्या अखत्यारीतील कामगिरी माझ्याकडे आली, तेव्हा मला ग्रामीण लोक डॉक्‍टर समजत. डॉक्‍टरेट मिळाली आहे म्हणजे काय, हे त्यांच्या लक्षात येत नसल्यानं ते मला वैद्यकीय तज्ज्ञ समजून माझ्याशी बोलत. त्या कालावधीत मी देशभर फिरले. चेरापुंजी ते सुंदरबन असा सारा भूभाग पिंजून काढला.

प्रश्न : गायिका, अभिनेत्री, दिग्दर्शक, इतर अभिनेत्रींना आवाज देणारी व लेखिका अशा आपल्या विविध पैलूंमुळे कला सादरीकरणाच्या समग्र परिणामात काय वेगळेपण जाणवतं?
बी. जयश्री : पक्ष्याला पंख दोनच असतात. मात्र, प्रत्येक पंखातील पिसांची संख्या विपुल असते. हे लक्षात घेऊन कलावंतांनी साकल्याने विचार करायला हवा. लेखन, गीत, संगीत, नृत्य, नेपथ्य, प्रकाश, संकलन, संपादन आदींची सखोल जाण रंगकर्मींना उंच भरारीसाठी रसद पुरवणारी ठरते. माझे आजोबा गुब्बी वीरण्णा यांची नाटक कंपनी होती, तिथं प्रत्येक अभिनेता गायनासह अभिनय करत असे. नृत्य करावं लागलं नाही तरी त्याबद्दल व्यवस्थित सारी माहिती असायलाच हवी, हे ते सांगत. मलाही तेच बाळकडू मिळालं.

प्रश्न : आपल्या कित्येक भूमिका गाजल्या आहेत. ‘नागमंडल’मधली आपली भूमिका तर काही अभिनेत्रींना आव्हानात्मक म्हणून मोहात पाडणारी ठरली. नव्या रंगकर्मींना आपण काय सांगाल?
बी. जयश्री : नवी पिढी सोशल मीडियात गुरफटून स्वतःच्या अनुभवविश्वाला स्वतःच मर्यादा घालते आहे. संगणक किंवा मोबाईल फोन हे तंत्रज्ञान झालं, त्यात कोंडून घेणं म्हणजे आपली सर्जनशीलता खुंटवणं. कल्पना व विचार करण्याच्या आपल्या क्षमतेला ही मंडळी यांत्रिक साधनांमुळे अडवतात. या साधनांचा उपयोग जरूर करावा; पण तो विवेकानं. मोबाईलवरील संदेशांसाठी वापरली जाणारी भाषा वेगळी आहे, तिचं व्याकरण वेगळं आहे. या भाषेच्या अतिरेकी वापरामुळे आपल्या मूळ भाषेवर गदा येते आहे. आपण घेऊ ते अनुभव जिवंत असतात, त्यांचा उपयोग केला जावा. सर्जनशीलता ही फक्त एखाद्या कलेपुरतीच नाही, तर संपूर्ण जीवनाच्या परिपूर्णतेसाठीचं माध्यम ठरू शकते, हे तरुण रंगकर्मींनी समजून घेतलं पाहिजे. 

Web Title: B. Jayashree interview