बाबा आढाव यांच्या मागण्या सरकारला मान्य

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016

पुणे - शेतीमालाला हमीभाव आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती या मागण्या अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वतः मान्य केल्या आहेत. याबाबतचे पत्र पालकमंत्री गिरीश बापट यांनी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांना दिले आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेले उपोषण सोडण्याबाबत निर्णय घेण्यासाठी डॉ. बाबा आढाव यांनी शुक्रवारी (ता. ७) सकाळी दहा वाजता मार्केट यार्ड येथे सभा बोलावली आहे. 

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालाला हमीभाव देण्यात यावा आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, या मागणीसाठी डॉ. बाबा आढाव हे गांधी जयंतीपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांच्यासमवेत पाटबंधारे विभागाचे निवृत्त मुख्य अभियंता विजय पांढरे हेही सहभागी झाले आहेत. या उपोषणाला सर्वच स्तरातून पाठिंबा व्यक्त होत आहे. या पार्श्‍वभूमीवर पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनीही बुधवारी डॉ. बाबा आढाव यांची भेट घेऊन त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली होती; परंतु सरकारने किमान आधी मागण्या तत्त्वतः मान्य कराव्यात, अशी इच्छा आढाव यांनी या वेळी व्यक्त केली होती. त्यानुसार गुरुवारी सकाळी फडणवीस आणि बापट यांनी डॉ. आढाव यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. हमीभाव आणि कर्जमुक्ती या दोन्ही मागण्या तत्त्वतः मान्य असल्याचे सांगत उपोषण सोडण्याची विनंती त्यांनी केली. बापट यांनी तसे पत्रही त्यांना दिले. मागण्यांची अंमलबजावणी कशी करायची, याबाबत लवकरच मुख्यमंत्री बाबा आढाव यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. 

उपोषणाबाबत सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्यामुळे त्याची दखल घेत उद्यापासून पुकारलेला भुसार, भाजीपाला, टेम्पो, पथारी यांचा बंद स्थगित करण्यात आल्याचे अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीचे निमंत्रक नितीन पवार यांनी सांगितले.

Web Title: baba adhav demand agree by government

टॅग्स