बाबा कल्याणी यांचा जपान सरकारकडून गौरव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

भारत आणि जपान यांच्यातील आर्थिक नाते दृढ करण्यासाठी दिलेल्या योगदानासाठी फोर्ज लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) बाबा कल्याणी यांना जपानच्या सरकारने ‘ऑर्डर ऑफ रायजिंग सन, गोल्ड अँड सिल्व्हर स्टार’ या पुरस्काराने गौरवले आहे.

पुणे - भारत आणि जपान यांच्यातील आर्थिक नाते दृढ करण्यासाठी दिलेल्या योगदानासाठी फोर्ज लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) बाबा कल्याणी यांना जपानच्या सरकारने ‘ऑर्डर ऑफ रायजिंग सन, गोल्ड अँड सिल्व्हर स्टार’ या पुरस्काराने गौरवले आहे. 

कल्याणी यांची नामवंत आंतरराष्ट्रीय उद्योजक म्हणून ओळख आहे. जपान-इंडिया बिझनेस लीडर्स फोरमचे ते सह-अध्यक्ष आहेत. दोन्ही देशांमध्ये उद्योगांना येणाऱ्या आर्थिक समस्येवर तोडगा काढण्यासाठी बाबा कल्याणी यांचा कायमच पुढाकार असतो; तसेच भारतात जपानमधील उद्योगांनी गुंतवणूक करावी, विस्तार करावा, यासाठी त्यांनी कायमच उत्तेजन दिले आहे. ऑर्डर ऑफ रायजिंग या गौरवाची सुरवात एम्परर मैजी यांनी १८७५ मध्ये केली. जपान सरकारचा हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान आहे.

आंतरराष्ट्रीय संबंध, जपानी संस्कृतीचा प्रसार, आपल्या क्षेत्रातील प्रगती व पर्यावरणाचे संवर्धन व कल्याण यांचा विकास यासाठी योगदान देणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. बाबा कल्याणी म्हणाले, ‘‘डेकोरेशन्स-ऑर्डर ऑफ रायजिंग सन हा पुरस्कार स्वीकारताना मला अतिशय आनंद होत आहे व अभिमान वाटतो आहे. या सन्मानाबद्दल मी जपानच्या सरकारचा आभारी आहे.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baba Kalyani Honor by japan Government