नीरा बाजार समितीच्या सभापतीपदी बबन टकले

संतोष शेंडकर
बुधवार, 20 जून 2018

सोमेश्वरनगर : नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बबन दत्तात्रेय टकले यांची तर उपसभापती काँग्रेसच्या वंदना संभाजी गरूड यांची बिनविरोध निवड आज करण्यात आली. या निवडीने टकले यांच्या निष्ठेला न्याय मिळाला आहे. 

सोमेश्वरनगर : नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बबन दत्तात्रेय टकले यांची तर उपसभापती काँग्रेसच्या वंदना संभाजी गरूड यांची बिनविरोध निवड आज करण्यात आली. या निवडीने टकले यांच्या निष्ठेला न्याय मिळाला आहे. 

पुरंदर तालुक्यातील 95 आणि बारामती तालुक्यातील 32 गावांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या नीरा बाजार समितीचे सभापती संजय गाडेकर व उपसभापती शंकर बाठे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी आज सासवड येथे निवडप्रक्रिया पार पडली. सहायक निबंधक मुकुंद गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड झाली. दुपारी साडेबारा वाजता सभापतीपदासाठी टकले यांचा तर उपसभापतीपदासाठी गरूड यांचेच अर्ज दाखल झाले. दुपारी दीड वाजता गायकवाड यांनी त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली. काँग्रेसचे जिल्हाध्य संजय जगताप व राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादीचे बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, पुरंदर तालुकाध्यक्ष माणिक झेंडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, सुदाम इंगळे, शिवाजी पोमण, नंदकुमार जगताप, बाळासाहेब कामथे, संजय चव्हाण, नारायण निगडे आदी मान्यवर उपस्थित होते. 

टकले हे कुठल्याही पदाशिवाय माजी केंद्रीय कृषीमंत्री यांच्या राजकारणप्रवेशापासून सोबत आहेत. याआधी त्यांना पुरंदर तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष म्हणून संधी मिळाली होती. आता बाजार समितीच्या सभापतीपदामुळे त्यांना न्याय मिळाला आहे. त्यांच्या निवडीसाठी पुरंदर तालुक्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ सहकारी आवर्जून उपस्थित होते. तर बेलसर गावच्या वंदना गरूड यांची निवड करून काँग्रेस नेते संजय जगताप यांनी महिलेला संधी देण्याचा मोठेपणा दाखविला आहे. बाजार समितीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संयुक्त आघाडीची सत्ता असून 2015-16 मध्ये काँग्रेसला तर 2016-17 मध्ये राष्ट्रवादीला सभापतीपद मिळाले होते. टकले यांच्या निवडीने सभापतीपद पुन्हा राष्ट्रवादीकडे राहिले आहे.  

उत्पन्नवाढ करणार

पवार कुटुंबियांच्या मार्गदर्शनाखाली नीरा बाजार समितीच्या उत्पन्नवाढीसाठी उपबाजार तयार करणे, सध्याच्या व्यवस्थेत सुधारणा करणे, भाजीपाला बाजार सुरू करणे अशा गोष्टींवर भर देणार आहे. तसेच दीवे येथे उपबाजार सुरू करण्यासंदर्भातील उर्वरीत प्रक्रीया पूर्ण करणार आहे, अशी प्रतिक्रिया बबन टकले यांनी व्यक्त केली.

 

Web Title: Baban Tuckle as Chairman of Neera market commit