Pune Rains : ढगांचा गडगडाट... धो धो पाऊस अन्‌ बाळाचा जन्म

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

मुसळधार पावसाने रस्त्यांना आलेले नाल्याचे स्वरूप... अशात सुरू झालेल्या प्रसववेदना... हा प्रसंग सातारा रस्त्यावर बुधवारी मध्यरात्री सव्वाबाराला उभा ठाकला... त्यानंतर एकामागोमाग संकटंच... या सगळ्यावर मात करत ‘तिने’ गोंडस बाळाला जन्म दिला...

पुणे - मुसळधार पावसाने रस्त्यांना आलेले नाल्याचे स्वरूप... अशात सुरू झालेल्या प्रसववेदना... हा प्रसंग सातारा रस्त्यावर बुधवारी मध्यरात्री सव्वाबाराला उभा ठाकला... त्यानंतर एकामागोमाग संकटंच... या सगळ्यावर मात करत ‘तिने’ गोंडस बाळाला जन्म दिला...

बुधवारी रात्री ढगांच्या गडगडाटासह पाऊस अक्षरशः कोसळत असतानाच सव्वाबाराच्या सुमारास सोनाली शिंदे यांना प्रसववेदना सुरू झाल्या. सातारा रस्त्यावरील सिद्धांत प्रसूतिगृहात त्यांची नावनोंदणी केलेली. त्यांना भर पावसात कसेबसे रुग्णालयात आणले. त्यांना रक्तस्राव सुरू होता. त्यातच आधीचे सिझेरियन असल्याने आई व बाळासाठी हा जीवन-मरणाचा प्रश्‍न होता. डॉ. सुनीता ललवाणी व त्यांच्या वैद्यकीय पथकाने सिझेरियन करायचे ठरविले. भूलतज्ज्ञांना दूरध्वनी केला; पण रुग्णालयाजवळ साचलेले पाणी, वाहतूक कोंडी यामुळे भूलतज्ज्ञांना रुग्णालयात पोचणे कठीण झाले. या दरम्यान, सोनाली यांना प्रसूती कक्षात घेतले. पावसाला सुरवात झाल्यापासून वीजपुरवठा खंडित झालेला, त्यामुळे विजेचा ‘बॅक अप’ संपला. मग सुरू झाले सोनाली यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याचे प्रयत्न. 

त्यांना अद्ययावत वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज रुग्णालयात हलविणे आवश्‍यक होते. तुफान पाऊस, रस्त्यावरून जोरदार वाहणारे पाणी, वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका मिळणेही कठीण झाले.

डॉ. सुनीता ललवाणी यांनी स्वतःच्या गाडीतून सोनाली यांना हलविण्याचा निर्णय घेतला. सिद्धांत हॉस्पिटलपासून पाचशे मीटरचे अंतर कापण्यास पंधरा मिनिटे लागली. त्याच दरम्यान भारती हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय मदत मागितली. तेथील वैद्यकीय संचालक डॉ. संजय ललवाणी यांनी पथक सज्ज ठेवले आणि पोलिसांकडे मदत मागितली. 

भारती हॉस्पिटलमध्ये डॉ. तुषार पंचनदीकर व त्यांचे ‘हाय रिस्क ऑबस्ट्रीक युनिट’मधील सर्व सहकारी तयार होते. हॉस्पिटलमधील पहिल्या मजल्यावरील ऑपरेशन थिएटरमध्ये सोनाली यांना नेण्यात आले. रक्तस्राव झाल्यामुळे त्यांना सात बाटल्या रक्त देण्याची गरज पडली. योग्य समन्वयाने व अथक प्रयत्नाने गोंडस बाळाचा सुखरूप जन्म झाला. डॉ. सिद्धांत ललवाणी, डॉ. नरेंद्र खैरनार, भूलतज्ज्ञ डॉ. खंडू पडवळ, डॉ. महिमा आर्य यांचा पथकात समावेश होता.

रुग्णवाहिकेसाठी ग्रीन कॉरिडॉर
पुणे वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त नवनाथ वाकुडे यांनी रुग्णवाहिकेसाठी ‘ग्रीन कॉरिडॉर’ करून दिला, त्यामुळे रस्त्यावर विरुद्ध दिशेने रुग्णवाहिका आली आणि तेथेच सोनाली यांना गाडीमधून रुग्णवाहिकेत हलविण्यात आले. त्या भारती हॉस्पिटलला पोचल्या; परंतु पावसामुळे हॉस्पिटलमध्ये सगळीकडे पाणी भरले होते, लिफ्ट बंद होत्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: baby birth in rain