"मुख्यमंत्र्यांनी सरकारी 'बाबूं'कडून तशी हमी घेतली का?"

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

'खून लो, जान मत लो'

वडनगरमध्ये 21 रोजी पंतप्रधानांच्या गावात 1 हजार शेतकरी रक्तदान करणार असून 'खून लो, जान मत लो' असे सरकारला निक्षून सांगणार आहेत.''

बारामती : 'रामदेवबाबांची औषधे अमेरिकेत पाठवायला केंद्र सरकार सर्व प्रकारच्या बंदी उठवते आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालावर मात्र सरसकट बंदी घालते. मागच्या सरकारांनी जे साठ वर्षांत शेतीचे वाटोळे केले, तेवढे वाटोळे भाजप सरकारने तर तीनच वर्षांत केले. कर्जमाफी दिल्यानंतर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, याची हमी मागणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी सातवा वेतन आयोग लागू करताना सरकारी कर्मचारी लोकांशी नीट वागेल, जोमाने काम करेल व भ्रष्टाचार करणार नाही, याची हमी घेतली होती का?'', असा सवाल आमदार बच्चू कडू यांनी आज येथे केला.

प्रहार संघटना व शेतकरी संघटना यांच्या वतीने सुरू असलेल्या 'सीएम टू पीएम' आसूड यात्रेचे आज बारामती तालुक्‍यात आगमन झाले. यानिमित्त घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार कडू बोलत होते. या वेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, कालिदास आपेट, जिल्हा शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडूरंग रायते आदी उपस्थित होते.

कडू म्हणाले, 'राज्यातली विरोधक मंडळी आता संघर्ष यात्रा काढत आहेत. मात्र, गेल्या साठ वर्षांत शेतीचे वाटोळे तर यांनीच केले. यांच्या काळात स्वामीनाथन आयोग सरकारने स्वीकारला. शेतकऱ्यांचा आता पुळका यांना येतो, मग यांनी हा आयोग आधीच लागू का केला नाही? यांनी संघर्ष यात्रा काढण्याअगोदर उठाबशा काढून शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे. आतापर्यंत वेगवेगळ्या सरकारांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या पोरांना जाती व धर्माच्या नावाने कट्टरवाद पाहायला लावला. आता शेतकऱ्याचा शेतीसाठीचा कट्टरवाद त्यांना पाहावा लागेल. राज्याचे मुख्यमंत्री गेली तीन वर्षे शेतकऱ्यांना बारा तास वीज देऊ, अशी आश्‍वासने देतात. शेतकऱ्यांनी जे मागितले ते कधीच यांनी दिले नाही, शेतकऱ्यांनी हागणदारीमुक्ती मागितली नव्हती, शेतकऱ्यांनी शेतमालाला भाव मागितला होता. जर भाव दिला असता; तर शिक्षण, आरोग्य यावर सरकारला काही करावे लागले नसते. वडनगरमध्ये 21 रोजी पंतप्रधानांच्या गावात 1 हजार शेतकरी रक्तदान करणार असून 'खून लो, जान मत लो' असे सरकारला निक्षून सांगणार आहेत.''

रघुनाथदादा पाटील म्हणाले, 'शेतकऱ्यांची सरकारी नोकरांविरोधात कधीच भूमिका नव्हती. मात्र, सरकारने सर्व पातळीवर शेतकऱ्यांशी लढता येत नाही, म्हणून आता अधिकारी पुढे केलेत. अरुंधती भट्टाचार्य, ऊर्जित पटेल यासारखे अधिकारी सरकार पुढे करते, मात्र या पुढील काळात शेतकरी विरुद्ध सरकारी नोकर असा वाद सुरू होणार आहे. त्याचे परिणाम भोगण्यासाठी सरकारने तयार राहावे.''

सदाभाऊ खोत यांना सल्ला
सदाभाऊ खोत व राजू शेट्टी यांच्यासंदर्भातील प्रश्नावर बच्चू कडू म्हणाले, 'लोक सांगतात की, सदाभाऊंनी अशी भाषणे केली की, डोळ्यात पाणी यायचे. आता सदाभाऊ सत्तेत गेलेत, त्यांच्या डोळ्यातले पाणीच आटले आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनात मोठे होऊन सत्तेत गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर गप्प राहणे चांगले नाही. सदाभाऊ, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे, तुमच्या डोळ्यातले त्यांच्यासाठीचे पाणी आटू देऊ नका. नाहीतरी राज्यमंत्र्याला अधिकारच काय आहेत? तुमच्यापेक्षा आमदार बरा.''

Web Title: bacchu kadu slams cm fadnavis over farmers suicides