पाठदुखीवर‘ रेडिओ फ्रिक्वेंन्सी’ने उपचार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

पुणे - सुशिला यांनी वयाची सत्तरी ओलांडली आणि त्यांची पाठदुखी सुरू झाली. काही दिवसांतच त्यांना झोपेत कुस बदलणे, बसून टीव्ही बघणे, अशा दैनंदिन गोष्टी करणंही अशक्‍यप्राय होऊ लागलं. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. सर्व उपाय करूनही वेदना थांबत नव्हत्या. माकड हाड आणि कमरेच्या सांध्याजवळ या असह्य वेदना होत होत्या. सर्व उपाय निष्प्रभ ठरल्याने ‘एसआय जॉईंट कूल्ड रेडिओफ्रिक्वेंन्सी ॲब्लेशन’ या आधुनिक पद्धतीचा देशातील पहिला यशस्वी प्रयोग पुण्यात करण्यात आला. 

आपल्याकडे पाठदुखी म्हणजे मणक्‍यातील गादीचा त्रास, असा समज आहे. शस्त्रक्रिया हाच त्यावरील अंतिम उपाय, असे मतही तयार झाले आहे. पण, शस्त्रक्रियेपूर्वी पाठदुखीचे नेमके निदान होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

पाठीच्या मणक्‍यातील सरकलेली गादी या व्यतिरिक्त पाठदुखीची अनेक कारणे असतात. हाडांच्या झीजेतून पाठदुखी होते, तशीच ती गादीची उंची कमी झाल्याने सांध्यांच्या झीजेमुळेही होते. त्यामुळे नेमके दुखणे कशात आहे, हे समजून उपचाराची दिशा निश्‍चित करणे आवश्‍यक असल्याचे मणका आणि वेदनानिवारण तज्ज्ञ डॉ. उत्तम सिधये यांनी सांगितले. 

खुब्याच्या भागात वेदना होऊन त्या बहुतांश वेळा मांडीच्या भागापर्यंतसुद्धा जाणवतात. जास्त प्रकारचे दुखणे जास्त वेळ बसल्यावर वाढते.

सर्वसाधारणपणे या प्रकारची पाठदुखी औषधोपचार व व्यायामाने बरी होते. क्वचित प्रसंगी त्यांना ‘कूल्ड  रेडिओफ्रिक्वेंन्सी ॲब्लेशन’चा वापर करून दीर्घ स्वरूपी वेदनानिवारण देता येते, असेही डॉ. सिधये यांनी स्पष्ट केले.  

‘कूल्ड रेडिओफ्रिक्वेंन्सी ॲब्लेशन’च्या माध्यमातून उपचार करताना शरीरावर कोणताही छेद घ्यावा लागत नाही. त्यामुळे रक्तस्राव होत नाही. उपचार करण्याच्या भागापुरती भूल देऊन अत्यंत कमी वेळात ही प्रक्रिया पूर्ण होते. त्यासाठी रुग्णाला रुग्णालयात दाखल करून ठेवण्याची गरज नसते. काही तासांमध्ये रुग्णाला घरी सोडले जाते.  

ज्येष्ठ नागरिकांमध्ये पाठदुखीच्या समस्यांवर शस्त्रक्रिया करताना मर्यादा येतात. त्यामुळे अशा रुग्णांसाठी हे तंत्रज्ञान वरदान असल्याचाही विश्‍वास डॉ. सिधये यांनी व्यक्त केला.

Web Title: Backache Treatment by Radio Frequency