सहा महिन्यातच रस्ता गेला वाहून

डी. के. वळसे पाटील
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे स्मशानभूमी ते वारसोळा हा पावणेदोन किलोमीटर लांबीचा डांबरी रस्ता सहा महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला होता. पण नुकत्याच झालेल्या पावसाने रस्त्याचा काही भाग वाहून गेला आहे. तब्बल तीस लाख रुपये रस्त्याच्या कामासाठी खर्च झाला आहे. ठेकेदाराच्या कामाविषयी गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

मंचर (पुणे) : अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे स्मशानभूमी ते वारसोळा हा पावणेदोन किलोमीटर लांबीचा डांबरी रस्ता सहा महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला होता. पण नुकत्याच झालेल्या पावसाने रस्त्याचा काही भाग वाहून गेला आहे. तब्बल तीस लाख रुपये रस्त्याच्या कामासाठी खर्च झाला आहे. ठेकेदाराच्या कामाविषयी गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याकडे रस्त्याची कामाची मागणी गावकऱ्यांनी केली होती. त्यानुसार वळसे पाटील यांनी रस्त्याच्या डांबरीकरण कामासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. रस्त्याचे काम सुरू होते त्यावेळी हलक्‍या प्रतीची खडी व अपुऱ्या प्रमाणात डांबर वापरल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. पण सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला समज देण्याऐवजी संरक्षण देण्याचे काम केले आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ठेकेदाराने रस्त्याचे काम पूर्ववत करावे. तसेच या रस्त्याच्या कामावर देखरेख ठेवणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्यातील शाखाअभियंता यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. या मागणीसाठी वेळप्रसंगी अवसरी खुर्दचे ग्रामस्थ आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.

स्मशानभूमी जवळील रस्त्याचा काही भाग वाहून गेल्यामुळे विद्यार्थी व नागरिकांना कसरत करतच प्रवास करावा लागतो. शेतीमाल बाजारपेठेत ने आण करताना अडचणींना सामोरे जावे लागते. सध्या वारसोळा, इंदोरेवाडी, गुरव वस्ती तसेच श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान मंदिर या भागातील नागरिकांचे रस्त्याअभावी अतोनात हाल सुरू आहे. वाहून गेलेल्या ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरणाचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी आंबेगाव तालुका पंचायत समिती सदस्य संतोष भोर यांनी केली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bad Codition Of Road In Ambegao Tehesil